Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभेसाठी बुधवार दि. १० मे रोजी मतदान पार पडले. त्याआधी मंगळवारी रात्री कर्नाटकात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. मात्र के आर पेट विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी रेवड्या वाटणाऱ्या नेत्यांना चांगलाच धडा शिकवला. या मतदारसंघात मंगळवारी रात्री भाजपाच्या काही नेत्यांनी ग्रामस्थांच्या घराबाहेर कोंबड्या आणि साड्या ठेवल्या होत्या. बुधवारी सकाळी मतदारांनी या भेटवस्तू गावातील भाजपा नेत्यांच्या घरासमोर जाऊन पुन्हा टाकल्या. ही बाब बाहेर आल्यानंतर काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. के आर पेट विधानसभेत येणाऱ्या बोकनकेरे तालुक्यात गंजिगेरे हे गाव येते. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे मोठे नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा जन्म याच गावात झाला होता. या गावातील ग्रामस्थांनी भाजपाने वाटलेल्या भेटवस्तू घेण्यास नकार दिला. या घटनेचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सकाळी ग्रामस्थ भाजपा नेत्याच्या घराबाहेर भेटवस्तू फेकतानाचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. या भेटवस्तू नाकारत असताना ग्रामस्थांनी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. निषेध व्यक्त करीत असताना मतदारांनी कन्नडमध्ये “धिक्कारा” असे नारे दिले. निवडणूक आयोगाकडे मात्र अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. तक्रार मिळाली नसली तरी आम्ही या प्रकरणात लक्ष घालू, असे आयोगाने सांगितले आहे. या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपा पक्षाचे पदाधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मंगळवारच्या प्रसंगाबाबत गावकऱ्यांनी सांगितले की, भाजपा कार्यकर्ते आमच्याकडे आले आणि त्यांनी चिकन, साड्या वाटल्या. अनुसूचित जातीचे प्राबल्य असलेल्या गंजिगेरे गावात भाजपाच्या नेत्यांनी मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी या भेटवस्तू वाटल्या होत्या. मात्र मतदारांनी या वस्तू स्वीकारण्यास नकार देऊन सकाळी भाजपाच्या नेत्यांच्या दारासमोर त्या वस्तू फेकल्या. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने काही ग्रामस्थांशी चर्चा केली. नाव न सांगण्याच्या अटीवर ग्रामस्थांनी माहिती दिली की, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या विभागात कोंबड्या आणि साड्या वाटल्या. पण आम्हाला या प्रलोभनांची गरज नाही. आम्ही ज्याला वाटेल त्याला मतदान करू. कुणाच्या सांगण्यावरून मतदान करणार नाही.

हे वाचा >> Karnataka Exit Polls : एक्झिट पोलवर भाजपा नाराज, काँग्रेसला गुदगुल्या, जेडीएसने मान्य केले अपयश

गंजिगेरे गावासोबतच आणखी एका गावात अशाच प्रकारे आमिषांचा पाऊस पडला. त्या गावातील ग्रामस्थांनी सुरुवातीला भेटवस्तू घेतल्या. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तिथे येऊन प्रश्न विचारल्यानंतर ग्रामस्थांनी त्या भेटवस्तू परत देऊन टाकल्या.

गंजिगेरे गावातील वकील लोकेश जी. जे. यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “ग्रामस्थांच्या या कृतीतून दिसते की त्यांना भाजपाला मतदान करायचे नाही. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भाजपा उमेदवार नारायण गौडा यांचे समर्थक गावात आले आणि त्यांनी मतदारांना कोंबड्या, पैसे आणि साड्या वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी सदर वस्तू स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर गौडाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास सदर वस्तू ग्रामस्थांच्या घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला. सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट ग्रामस्थांना कळली आणि त्यांनी रागात या सर्व वस्तू भाजपा नेत्याच्या घराबाहेर फेकल्या. तर काही ग्रामस्थांनी साड्या आणि इतर वस्तू नदीत फेकून दिल्या.”

के आर पेट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असल्याचे समजले जाते. काही वेळा जेडीएसनेदेखील इथे विजय मिळवला आहे. २०१३ आणि २०१८ साली जेडीएसच्या के. सी. नारायण गौडा यांनी येथून विजय मिळवला होता. मात्र २०१९ साली काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यात नारायण गौडा यांचाही समावेश होता. २०१९ साली ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी गौडा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र बी. एस. येडियुरप्पा यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपामध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसने के आर पेट मतदारसंघातून बी. एल. देवराजा (२०१९ च्या पोटनिवडणुकीत जेडीएसकडून निवडणूक लढवली) यांना उमेदवारी दिली आहे, तर जेडीएसने एच. टी. मंजू यांना तिकीट दिले आहे. यंदा या मतदारसंघात ७४.३० टक्के एवढे विक्रमी मतदान नोंदविले गेले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp distributed chicken and sarees before voting but voters threw gifts at the bjp leaders door kvg