पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून भारतीय जनता पक्षातून एका पदाधिकाऱ्याची गच्छंती करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बिकानेरच्या भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. उस्मान घानी असं त्यांचं नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील प्रचारसभेत केलेल्या विधानावर उस्मान घानी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीने पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचं कारण देत उस्मान घानी यांना पक्षातून काढून टाकलं आहे.
नेमकं घडलं काय?
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, उस्मान घानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानांमुळे राजस्थानमधील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी किमान तीन ते चार जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव होणार आहे, असं उस्मान घानी म्हणाले होते. तसेच, मोदींनी केलेल्या विधानांचा त्यांनी निषेधही केला. एक मुस्लीम म्हणून माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानांमुळे भ्रमनिरास झाला आहे, असं ते म्हणाले.
“जेव्हा मी मुस्लिमांकडे मतं मागायला जातो…”
“मी सत्य नाकारत नाही. मी स्पष्ट बोलतो. राजस्थानमध्ये तीन-चार जागांवर भाजपाचा पराभव होईल असं मला वाटतंय. एक मुस्लीम म्हणून मला त्यांचं विधान आवडलं नाही. हा काही फक्त एकट्या मोदींचा पक्ष नाही. भाजपाबरोबर शेकडो मुस्लीम जोडलेले आहेत. आम्ही जेव्हा जनतेत मुस्लिमांकडून मतं मागतो तेव्हा आम्हाला त्रास होतो. मुस्लीम लोक आम्हाला विचारतात की मोदींच्या विधानाबद्दल तुमच्याकडे काय उत्तर आहे”, असं उस्मान घानी या वाहिनीवरील प्रतिक्रियेत म्हणाले होते.
“मी मोदींनाही मेल करून सांगणार आहे की तुम्ही अशा प्रकारच्या निरर्थक फालतू गोष्टी बोलला नाहीत तर फार बरं होईल. ते पंतप्रधान आहेत, त्यांची खूप मोठी ओळख आहे हे मान्य. पण हा हिंदुस्थान आहे. इथे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल”, अशा शब्दांत उस्मान घानी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.
“मी जे बोललो त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी पक्षासाठी मेहनत घेतो. पक्षासाठी एकेक मत जोडतो. त्यामुळे जर मला एखादी गोष्ट आवडली नाही, चुकीची वाटली तर मी पक्षाच्या विरोधातही बोलेन”, असंही उस्मान घानी यांनी ठामपणे म्हटलं होतं.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
राजस्थानच्या बन्सवाडा परिसरात केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम समुदायाबाबत केलेलं विधान वादग्रस्त ठरलं आहे. “काँग्रेस पक्ष सत्तेत आला, तर देशाची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना, घुसखोरांना म्हणजे मुस्लिमांना वाटून टाकेल”, असं मोदी म्हणाले होते.