लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे पाच दिवस बाकी आहेत. तरी महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं नव्हतं. महायुतीचे कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. मात्र महायुतीने दोन दिवसांपूर्वी ठाणे आणि कल्याणच्या जागेबाबत निर्णय घेतला तर काल (बुधवार, १ मे) नाशिकच्या जागेवरील उमेदवार जाहीर केला. पाठोपाठ महायुतीने आज (२ मे) पालघरच्या जागेचा तिढा सोडवला आहे. ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्या असून शिंदे गटाने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवारी जाहीर केले आहेत. तर, आज भाजपाने त्यांचा पालघरचा उमेदवार जाहीर केला.
महायुतीत पालघरची जागा भाजपाने आपल्याकडे घेतली असून त्यांनी येथून हेमंत विष्णू सावरा यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने ही उमेदवारी जाहीर केली असून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सावरा यांच्या उमेदवारीची माहिती दिली आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबतच्या चर्चेदरम्यान, भाजपाने ठाणे लोकसभेवर दावा केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अधिक आग्रह धरल्याने भाजपाने या जागेवरील दावा सोडला. मात्र त्याबदल्यात त्यांनी पालघरची जागा मागितली. अखेर शिंदे गटाने पालघरच्या जागेवरील दावा सोडला आणि आज भाजपाने येथील त्यांचा उमेदवार जाहीर केला.
महायुतीने राजेंद्र गावितांना डावललं
देशभरातील मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९, २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालघरची जागा भाजपाने लढवली होती. यापैकी २०१४ आणि २०१८ येथे भाजपाला विजय मिळाला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या चिंतामण वनगा यांनी येथून विजय मिळवला होता. मात्र २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गावित यांना भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार गावितांनी रितसर शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
शिवसेना फुटल्यानंतर गावित एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाले. ते यंदादेखील लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते. महायुतीत ही जागा भाजपाला सुटेल असं दिसू लागल्यावर गावित स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र महायुतीने गावितांना डावलून हेमंत सावरा यांना पालघरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने बुधवारी ठाणे, नाशिक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना, ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना आणि नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.