BJP Candidate List : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. यातच आज विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची ९९ उमेदवारांची पहिली यादी (BJP First candidate list) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने १३ महिलांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे.

भाजपाने कोणत्या १३ महिलांना उमेदवारी दिली?

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १३ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधून प्रतिभा पाचपुते, पुण्यातील पर्वती मतदारसंघामधून माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघामधून मेघना बोर्डीकर, भोकर मतदारसंघामधून श्रीजया अशोक चव्हाण, फुलंब्रीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष अनेकांचा पत्ता कट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, भाजपाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

अशोक चव्हाणांच्या मुलीला उमेदवारी

काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर घेतलं होतं. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघामधून भाजपाने उमेदवारी दिली आहे. श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. त्या पेशाने वकील आहेत. तसंच भाजपाने तिकिट देण्याआधी भाजपा युवा मोर्चाचं काम करत आहेत. भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे. मुदखेड या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. तेव्हापासूनच श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील काही महिन्यांपासून श्रीजया चव्हाण या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या होत्या. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असतील हे लक्षात घेवून चव्हाण यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला होता. आता भाजपाने त्यांनी भोकरमधून संधी दिली आहे.

Story img Loader