भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झालं. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत ‘मुंबईचे योद्धे’ संसदेत जाणार असे म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी काय म्हटलं?
“मुंबईचे योद्धे संसदेत जाणार! १९९३ मुंबई बॉम्बस्फोट घडवून मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या याकूबसह अन्य दहशतवाद्यांना तसेच मुंबईवर दहशतवादी हल्ला करून या देशावरच हमला चढवणाऱ्या अजमल कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यत कायदेशीर कडवा संघर्ष करणारे ‘मुंबईकरांचे योद्धे’ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईकरांचा असलेला प्रचंड विश्वास. विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी केलेले काम आणि भाजपाचे मजबूत संघटन या जोरावर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ‘मुंबईचे योद्धे’ अॅड. उज्ज्वल निकम मुंबईकरांच्या विक्रमी मतांनी विजयी होऊन संसदेत जाणार”, असं आशिष शेलार यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, “भारताची प्रतिमा मोदींमुळेच जगात उंचावली”
पूनम महाजन यांचा पत्ता कट
खासदार पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. मात्र, त्यांचं तिकीट अचानक कापण्यात आल्याने आचा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. खासदार पूनम महाजन या २०१९ मध्ये एक लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या या विजयात त्यावेळी ठाकरे गटाचीही किमान लाखभर मते होते. तसेच खासदार पूनम महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि मतदारांच्या संपर्कात न राहिल्यामुळे भाजपाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे.