लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यासाठी उद्या (दि. १३ मे) मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष असल्यामुळे जागावाटपाची चर्चा चांगलीच रखडली. विशेषतः महायुतीमध्ये नाशिक, ठाणे आणि दक्षिण मुंबई हे मतदारसंघ आपल्याकडे राहावेत, यासाठी शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रयत्न केले. भाजपाने ठाणे लोकसभेवर दावा सांगितला होता. पण अखेर त्यांना हा मतदारसंघ का सोडावा लागला? याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. मुंबई तक या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांची चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“१८ वर्षांनी धनुष्य-बाण असलेल्या मंचावर राज ठाकरे, मराठी माणसाची इच्छा..”, राजू पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांच्या दबावापुढे झुकल्यामुळे भाजपाला काही मतदारसंघ सोडावे लागले, विशेष करून ठाण्याचा दावा सोडावा लागला का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांनुसार जागावाटपाची चर्चा झाली होती. आम्ही हत्ती बाजूला करून फक्त शेपूट ठेवले होते. विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील जागांची चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. आमचा ९० टक्के पेपर सोडवून झाला होता. १० टक्के पेपर बाकी होता. पण जेव्हा हा उरलेला पेपर सोडवायला घेतला, तेव्हा एकाच बैठकीत निर्णय घेतला. त्यासाठी आम्हाला दुसरी बैठक घ्यावी लागली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंचा अवमान करायचा नव्हता

ठाणे लोकसभेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ठाणे लोकसभा मतदारसंघ हा आमचाच होता. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जग्गनाथराव पाटील यांच्या काळापासून ठाणे लोकसभा आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला हा मतदारसंघ हवाच होता. पण शिंदे गटाने जो तर्क समोर ठेवला तोही आम्हाला मान्य झाला. स्व. आनंद दिघे यांनी ठाणे मतदारसंघ बाळासाहेबांकडून मागून घेतला होता. आता दिघेंचेच सहकारी राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून ही जागा जाणे, हे मुख्यमंत्री शिंदेंसाठी अडचणीचे ठरले असते, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला अपमानित करून एखादी जागा मिळवावी, असा हेतू आमचा नव्हता. त्यामुळे आम्ही ती जागा सोडली.

ठाणे लोकसभेत आमचे चार आमदार आहेत. तीन महानगरपालिकांपैकी दोन मनपात आमचे बहुमत आहे. ठाण्यात आमची मोठी ताकद आहे. पण मित्रपक्षाला अपमानित करून जागा घ्यायची नाही, हे आमचे धोरण होते, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; “उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच…”

रवींद्र वायकर यांना जाब विचारणार

महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक दावा केला होता. “माझ्यासमोर तुरुंग किंवा पक्ष बदलणे असे दोनच पर्याय होते. त्यामुळे मी जड अंतःकरणाने पक्ष बदलला होता”, असे वायकर म्हणाले होते. वायकर यांच्या दाव्याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही कुणालाही उमेदवार करण्यासाठी दबाव टाकू अशी परिस्थिती नाही. रवींद्र वायकर हे असे का म्हणाले? याबाबत जाब विचारणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader devendra fadnavis big statement on lok sabha seat sharing with shivsena shinde faction kvg