लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले, यानंतर आता तिसरा टप्पाही जवळ आला. मात्र, तरीही महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटला नाही. नाशिकच्या जागेबाबत भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा सुटला नसल्याची चर्चा आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये घडामोडीला वेग आला आहे. उद्या (ता.१ मे) दुपारपर्यंत नाशिकचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती भाजपा नेते गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरीश महाजन काय म्हणाले?

“नाशिक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरायला अजून दोन दिवस बाकी आहेत. उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले तरी आम्ही सर्व तयारी करुन ठेवली आहे. नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते २ तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उमेदवारी जाहीर होण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र, त्यामुळे काही फरक पडणार नाही. एका-एका मतदारसंघामध्ये २५-२५ हजार कार्यकर्त्यांची टीम तयार आहे, त्यामुळे आमची तयारी नाही असे अजिबात नाही. नावाला आमच्याकडे काहीही महत्व नाही. उमेदवारीसाठी नाव कुणाचेही जाहीर होऊ द्या, आम्ही महायुतीचे काम करणार आहोत”, असे गिरीश महाजन म्हणाले.

हेही वाचा : ठरलं! अरविंद सावंतांना टक्कर देणार यामिनी जाधव, शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईत लोकसभेची उमेदवारी जाहीर

“आमचा अंतिम उद्देश हा उमेदवार निवडून आणणं हाच आहे. आम्ही सर्वांनी ४०० पारचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. महायुती उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकेल, असा आमचा ठाम विश्वास आहे”, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपाचा नाशिकच्या जागेवर दावा आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “या संदर्भात आमचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आमच्याकडे वाटाघाटी असते. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, त्यामध्ये एखादी जागा इकडे तिकडे होत असते. त्यामुळे मला याबाबत आज सांगणं कठीण आहे. मात्र, उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल”, असे गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकच्या जागेबाबत अडचण का आली?

नाशिकच्या जागेबाबत अडचण का आली? याबाबत गिरीश महाजन म्हणाले, “आमचे तीन-चार पक्ष एकत्र आहेत. वाटाघाटीमघ्ये कोणती जागा कोणाला, कोणी किती जागा घ्याव्या, यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत कोणती अडचण आहे, असा कोणताही भाग नाही. आज दक्षिण मुंबईची जागा जाहीर झाली. पाच ते सहा जागा अशा आहेत की, त्यामध्ये कोणती जागा कोणी घ्यावी, यासंदर्भात चर्चा सुरु होती. त्यामुळे येथील उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल, त्यानंतर आम्ही सर्व एकदिलाने काम करु”, असे गिरीश महाजन म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader girish mahajan on nashik lok sabha constituency candidate politics gkt
Show comments