लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणामध्ये भाजपाला धक्का बसला आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेसने चांगलीच टक्कर दिली असून भाजपाचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. या कलांबद्दल भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजचा सुरुवात झाली, आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणामध्ये चांगली कामगिरी केली आहे. या तीन राज्यांच्या निकालांबद्दल भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये काय म्हणालेत ते जाणून घेऊयात.
“उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणा या तिन्ही राज्यांमध्ये नेमकं काय घडलं हे आता या क्षणी आपल्याला सांगता येणार नाही. पण ही राज्ये वगळता बाकी पूर्ण भारतातून जे आकडे येत आहेत ते आपण अंदाज व्यक्त करत होतो, त्याप्रमाणेच आहेत. हे लोकसभेचे निकाल आहेत त्यामुळे जोपर्यंत ५० हजारांची आघाडी घेत नाहीत तोवर ती आघाडी कुठल्याही बाजूने जाऊ शकते. त्यामुळे तशी लीड अजून कुठेच आलेली नाही, पंकजा मुंडे अगदी कमी मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे यात बदल होऊ शकतो आणि त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पण या तीन राज्यांचे निकाल आता सुरुवातीला तरी नक्कीच धक्कादायक आहेत,” असं केशव उपाध्ये ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये ८० जागांपैकी ३६ जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. तर, भाजपाही तितक्याच जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमचे सुरुवातीचे निकाल भाजपाला धक्का देणारे आहेत, कारण २०१९ मध्ये एनडीएने या राज्यात ६४ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत. २०१९ मध्ये एनडीएने सर्व जागा जिंकल्या होत्या, पण आता इथे भाजपा १७, इंडिया आघाडी ७ व एका जागेवर इतर आघाडीवर आहेत.
हरियाणामध्ये लोकसभेच्या १० जागा आहेत, त्या सर्व जागा २०१९ मध्ये एनडीएने जिंकल्या होत्या, पण यावेळी मात्र पाच जागांवर काँग्रेस तर पाच जागांवर भाजपा आघाडीवर आहे.