मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग येण्यास सुरुवात होत आहे. शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव, उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून शिवसेना आणि खासकरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले जात आहे. किरीट सोमय्या यांनी भूतकाळात ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या नेत्यांना विजयी करण्यासाठी आता त्यांना प्रचार करावा लागणार आहे. यावर आता किरीट सोमय्या यांनीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
टिव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना किरीट सोमय्या यांना यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते चांगलेच खवळले. ते म्हणाले, हा प्रश्न मला विचारता, पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांना हा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवा. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आम्ही मतदान मागणार आहोत. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नंदकिशोर चतुर्वैदीकडून आलेले २०० कोटी कुठे गेले? हे सांगावे.
घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणे ही तडजोड?
ज्यांच्यावर आजपर्यंत घोटाळ्याचे आरोप केले त्यांचाच प्रचार करावा लागणे ही तडजोड आहे का? असा प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या म्हणाले, भारताला पहिल्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविणे याला मी कधीही तडजोड म्हणणार नाही. आपला देश पंतप्रधान निवडत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराकडून आम्ही मोदींसाठी मत मागणार, असे सांगून किरीट सोमय्या यांनी या प्रश्नावर थेट बोलणे टाळले.
वायकर आणि यामिनी जाधव यांच्या प्रचाराची वेळ
रवींद्र वायकर यांच्या रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील घरे आणि जोगेश्वरीतील आलिशान हॉटेलच्या बांधकामातील अनियमिततेसंदर्भात सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यांना अटक होणार अशी भविष्यवाणी सोमय्यांनी केली होती. मात्र त्यानंतर वायकर ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात आले आणि चौकशी थंडावली. आता तर त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्यावरही सोमय्या यांनी आरोप केले. त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असून काही मालमत्तांवर टाचही आली आहे. शिंदे गटाने त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली आहे.