लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी शेवटचा एक दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे “बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले? हे सर्वांना माहिती आहे”, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे आहे, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“आपल्याला नरेंद्र मोदी यांची हॅटट्रिक परत पाहायची आहे. त्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे. खरंच या निवडणुका विकासावर होतात का? नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजनांचा अनेकजण लाभ घेत आहेत. गरीबांची काळजी घेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मी ज्यावेळी ग्रामविकास मंत्री होते, त्यावेळी ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना अशा अनेक योजनांची माळ प्रत्येक वंचित भागाला घातली आहे. दुष्काळी भागाला बदलण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्याचे काम करतील”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा : “…तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”; शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिलं. मात्र, आताचे महाराष्ट्रातील काही नेते हे विसरायला लागले आहेत. विरोधकांकडे काहीही मुद्दे नाहीत. मोदींना थांबवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते जाती आणि धर्माच्या भिंती बांधण्याचं काम करत आहेत. हे लोकं जाती आणि धर्मात छेद पाडण्याचं काम करत आहेत.पण हे होऊ दिलं नाही पाहिजे, ही माझी विनंती आहे. बीड जिल्ह्याची निवडणूक मी लढले. बीड लोकसभेची निवडणूक आताच पार पडली. या बीडची निवडणूक मी कशी लढले? तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“एका सामान्य कुटुंबातील एखादी महिला मोठी होत असेल तर तिच्या मागे उभा राहण्याचे संस्कार गोपीनाथ मुंडे यांनी केले आहेत. तुम्हीदेखील भारती पवार यांच्या मागे उभा राहणार की नाही? माझी चिंता करण्याचं कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका. नेतृत्व हे मंत्रिपदासाठी नाही तर वंचितांच्या सेवेसाठी असतं”, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.