लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बुधवारी (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या प्रचाराच्या सभेत बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. “प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेवारी दिली. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचं काय? त्यांना भारतीय जनता पार्टीकडून दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होते. यातच पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलं.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महायुतीचा नाशिकचा तिढा सुटेना
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात रस्सीखेच सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीने या जागेवर दावा कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांना मी नाशिकमधून उभे करेल असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.