विधानसभेच्या निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्ष पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि SKM पक्षाचे नेते प्रेमसिंग तमांग यांनी रेनॉक मतदारसंघात त्यांचे सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) प्रतिस्पर्धी सोम नाथ पौड्याल यांच्यावर सात हजार ४४ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तर, अरुणाचल प्रदेशमध्ये अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या भाजपाला सिक्कीममध्ये साधं खातंही उघडता आलेलं नाही.
गंगाटोक येथे पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. यावेळी सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही जिंकणार असल्याचं निश्चित झालं आहे. मी संपूर्ण सिक्कीमच्या जनतेचे आभार मानतो. २०१९ ला सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या. करोनोचा काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती अशा परिस्थितीही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सिक्कीमच्या लोकांसाठी काम केलं होतं. त्यामुले या विजयाचं श्रेय मी सिक्कीमच्या जनतेला देतो. पूर्व मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना आम्ही हरवलं आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने मनापासून प्रत्येक मतदारसंघात काम केलं होतं. त्या कामाची पावती म्हणून आम्ही जिंकलो आहे. चामलिंग २०१९ लाच हरले होते. परंतु, ही लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी २०२४ लाही निवडून लढवली. गेल्या २५ वर्षांत त्यांनी जे केलं नाही ते आम्ही ५ वर्षांत केलं. म्हणूनच त्यांचा पराजय झाला.”
दरम्यान, एसडीएफला केवळ शायरी मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि एसडीएफ अध्यक्ष पवन कुमार चामलिंग हे SKM उमेदवार भोज राज राय यांच्याकडून ३ हजार ६३ मतांच्या फरकाने हरले. गेल्या निवडणुकीत एसकेएम पक्षाने १७ जागा तर, एसडीएफने १५ जागांवर विजय मिळवला होता. यंदा तर, एसकेएमने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत एसडीएफला धूळ चारली आहे.
सिक्कीमचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एसडीएफचे प्रमुख पवन कुमार चामलिंग यांचा पोकलोक कामरंग आणि नामचेबुंग विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आठ वेळा आमदार राहिलेले चामलिंग हे त्यांच्या मूळ नामची जिल्ह्यातील पोकलोक कामरंग जागेवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या भोज राज राय यांच्याकडून तीन हजार ६३ मतांनी पराभूत झाले. राय यांना ८ हजार ३७ मेत मिळाली तर, चामलिंग यांना ४ हजार ९७४ मते मिळाली. चामलिंग हे १९९४ ते २०१९ पर्यंत २५ वर्षे सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.
सिक्कीम भाजपा प्रदेशाध्यक्षांचीही निवडणुकीत हार
सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्ली राम थापा यांना अप्पर बुर्टुक विधानसभा मतदारसंघातून SKM उमेदवार कला राय यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. थापा हे राय यांच्याकडून २ हजार ९६८ मतांनी पराभूत झाले.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाही एकहाती
लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. १९ एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४६ जागांवर विजय मिळवला असून मागच्या टर्मचा स्वतःचाच रेकॉर्ड त्यांनी मोडला आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे, अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे ८२.९५ टक्के मतदान झाले. तर, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला सुरुवातीलाच १० जागांवर बिनविरोध विजय मिळाला. तर, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भाजपाच्या पारड्यात ४६ जागा गेल्या आहेत. तिथं बहुमतासाठी ३१ जागा गरजेच्या आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.