BJP Megharani Jadhav Kolhapur Speech : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्षांचा प्रचार हा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’भोवतीच असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीतील सर्व पक्ष या योजनेचा व त्या माध्यमातून महायुतीतील पक्षांचा, उमेदवारांचा व नेत्यांचा प्रचार करत आहेत. तर काही नेते या योजनेचं अमिष दाखवून, सरकार बदलल्यावर ही योजना बंद पडेल असा प्रचार करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेचा प्रचार करताना वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. “लाडकी बहिण योजने’चे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आणि ते आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं होतं. त्यापाठोपाठ महायुतीमधून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १,५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मत न देता इकडे तिकडे मत दिलं तर तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू अशी तंबी कोल्हापूर भाजपाच्या महिला उपाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव यांनी दिली आहे. जाधव यांनी कोल्हापूरमध्ये एका प्रचारसभेत बोलत असताना उपस्थित महिलांना अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे कोल्हापूरमधील वातावरण तापलं आहे.

हे ही वाचा >> Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

मेघाराणी जाधव म्हणाल्या, “बायकांनो! माझी तुम्हा सर्व बहिणींना शपथ आहे, इथून जाताना सगळ्यांना सांगा, फक्त धनुष्यबाणाला मतदान करायचं, नाही केलं, इकडं-तिकडं काही केलं आणि आम्हाला ते समजलं तर त्यांनी (महायुती सरकारने) १५०० रुपये दिलेत, तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू”.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

खासदार धनंजय महाडीक काय म्हणाले होते?

धनंजय महाडिक म्हणाले होते, “जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp megharani jadhav threaten voters if dont vote for shivsena will ransom rs 3000 maharashtra assembly election 2024 asc