मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर, ३ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पण, ठिकठिकाणी तिकीट वाटपावरून राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपाच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे आमदाराला रडू कोसळलं असून, प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
छतरपूर जिल्ह्यातील चंदला विधानसभेचे आमदार राजेश प्रजापती यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. यांनतर संतप्त झालेल्या प्रजापती यांनी थेट प्रदेशाध्यक्ष वी.डी शर्मा यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला. तिकीट देण्यात आलेला नेता आरोपी असून मटका खेळतो, असेही प्रजापतींनी सांगितलं.
“चुकीचं काम करणाऱ्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. अशा नेत्याच्या बाजूनं कोण उभा राहणार? सर्वेत माझं नाव होतं. तरीही तिकीट का नाकारण्यात आलं?” असे सवाल उपस्थित करतानाच राजेश प्रजापतींना माध्यमांसमोर रडू कोसळलं.
हेही वाचा : राजस्थानात वसुंधरा राजेंचे दमदार ‘पुनरागमन’
यानंतर राजेश प्रजापती यांनी आपल्या कार्यकर्त्यांची आणि भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी आमदार विजय बहादूर सिंह हेही उपस्थित होते. बैठकीत तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.