पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली. धाराशिव हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघात अर्चना पाटील यांना याठिकाणी उमेदवारी देण्यासाठी आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील हे मात्र भाजपामध्येच राहणार आहेत. अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये काही निवडक मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यात धाराशिवच्या मतदारसंघाचाही समावेश होता. २०१९ साली शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर याठिकाणाहून निवडून आले होते. ओमराजे निंबाळकर सध्या उबाठा गटाबरोबर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला होता. अखेर चर्चेतून राष्ट्रवादीला धाराशिव मतदारसंघ मिळाला. मात्र त्यानंतर उमेदवार ठरविण्याचा प्रश्न होता. त्यातून ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी पाटील कुटुंबातून उमेदवार देण्यासाठी अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. याआधी पद्मसिंह पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवत असत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील पिता-पुत्रांनी अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर पाटील यांनी तुळाजपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला.
कोण आहेत अर्चना पाटील?
अर्चना पाटील यांनी याआधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती म्हणून काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या सामाजिक कामातून लोकांच्या संपर्कात असतात. लेडीज क्लबच्या माध्यमातून त्या धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी काम करत असतात.