Arvind Dharmapuri Controversy Statement K Chandrashekar Rao and KT Rama : आगामी दोन महिन्यांमध्ये आता देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच सर्व पक्षांमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. याचदरम्यान तेलंगणामध्ये भाजपा आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. यातच भाजपाचे निजामाबादचे खासदार अरविंद धमर्पुरी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचा मुलगा के.टी. रामाराव यांचा मृत्यू झाल्यास भाजपा त्यांना आर्थिक मदत करील, असे वक्तव्य केले आहे. अरविंद धर्मपुरी यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
मंगळवारी एका निवडणूक कार्यक्रमामध्ये खासदार अरविंद धर्मपुरी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भारत राष्ट्र समितीच्या जाहीरनाम्यावरून पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. बीआरएस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केसीआर विमा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा जीवन विमा देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आले आहे. बीआरएसच्या जाहीरनाम्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असेल, तरच कुटुंबीयांना जीवन विमा दिला जाईल, असे म्हटल्याचा आरोप भाजपा खासदार धर्मपुरी यांनी केला आहे.
बीआरएसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना धर्मपुरी म्हणाले, ”केसीआर यांचा मृत्यू झाल्यास भाजपा पाच लाख रुपयांची मदत करील. तसेच केसीआर यांचा मुलगा के. टी. रामराव यांचा मृत्यू झाल्यास आम्ही १० लाखांची मदत करू. तसेच आता केसीआर यांची वेळ संपत आलेली आहे. जर का केसीएआर यांची मुलगी कविता यांचा मृत्यू झाला, तर मी २० लाख रुपयांची मदत जाहीर करीन.”
”अरविंद धर्मपुरी यांनी माझ्याबाबत जे वक्तव्य केले आहे, असे वक्तव्य कोणी तुमच्या मुलींबाबत केले असते, तर तुम्ही गप्प बसाल का? मी राजकारणात सक्रिय आहे आणि केसीआर यांची मुलगी आहे म्हणून ही बोलण्याची योग्य पद्धत आहे का? केसीआर यांच्या मुलीचा मृत्यू झाल्यास मी २० लाख रुपये जाहीर करेन. केसीआर यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये आणि वडिलांचा मृत्यू झाला तर पाच लाख रुपये देऊ. या प्रकारचे वक्तव्य, भाषा आणि वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे कितपत योग्य आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे”, असे कविता म्हणाल्या.
दरम्यान, पुढील दोन महिन्यांमध्ये तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सत्ताधारी भाजपा, काँग्रेस आणि इतर प्रमुख राजकीय पक्षांसाठी एक प्रकारची उपांत्य फेरी असल्याचे म्हटले जात आहे.