सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यात सामना रंगला आहे. आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केट शौचालय टेंडर घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यावरून उदयनराजे भोसले यांनी खोचक शब्दात टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनराजे भोसले काय म्हणाले?

“विकास कामे करण्साठी स्थिर सरकारची आवश्यकता असते. ज्यावेळी अस्थिर सरकार असते, त्यावेळी पाच वर्षाच्या विकासाची योजना कधीही पूर्णत्वास जात नाही. अनेकांनी महायुतीवर टीका केली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारला कारण विकासाची कामे होत नव्हती. जेव्हा अस्थिर सरकार असते तेव्हा अशी परिस्थिती असते. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जे पाऊल उचलले ते योग्य होते”, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

हेही वाचा : “शिवसेनेतील बंडाची माहिती अजित पवारांनाही होती, पण…”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

काँग्रेसच्या काळात आपण ज्यांना मतदान दिले, त्यांनी काहीही काम केले नाही. आता महाविकास आघाडीचे नेते लोकांसमोर जात असताना त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाबाबतही एकमत होत नसल्याची परिस्थिती आहे. इंडिया आघाडीकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. ज्यावेळी कोणतेही नियोजन नसते, त्यावेळी देशाची प्रगती नाही तर अधोगती होते”, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी आघाडीच्या नेत्यांवर केली.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, “आपल्या देशातील ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. महायुचीच्या सरकारने साखर कारखान्यांवरील टॅक्स रद्द केला. मात्र, आघाडीच्या सरकारची इच्छाशक्ती नव्हती. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीचे सरकार विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे. काँग्रेसच्या काळात जय जवान, जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र, गरीबांसाठी काहीही झाले नाही”, अशी टीका त्यांनी केली.

शशिकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर एपीएमसी फळ मार्केट टेंडर घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप झाले. यावर बोलताना उदयनराजे भोसले यांनी खोचक शब्दात टीका केली. उदयनराजे भोसले म्हणाले, “चार हजार पेक्षा जास्त कोटींचा घोटाळा झाला. ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना खड्यात घालण्याचे काम त्यांनी केले. यानंतर त्यांनी ७ तारखेपर्यंत लोकांशी संवाद साधायचा आहे म्हणून न्यायालयात जामीन मागितला होता. मग तुम्ही काही केले नसेल तर तुमचं मन का खातं होतं? मग न्यायालयात जायचं नव्हत ना? एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार, एका मार्केट कमिटीवर एवढा मोठा भष्ट्राचार केला असेल तर समजा त्यांना खासदार बनवलं तर काही होणार नाही. तुम्ही तुमचे कपाटं आणि खिशालाही वेडिंग करून ठेवा, कारण त्यामध्येही ते काहीही शिल्लख ठेवणार नाहीत”, असा टोला उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp udayanraje bhosale on ncp shashikant shinde and satara lok sabha constituency politics lok sabha election 2024 gkt