पुढील दोन महिन्यांमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. याच दरम्यान काँग्रेस पक्ष आपल्या निवडणूक प्रचारासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी कर्नाटक राज्याचा वापर एटीएम सारखा करत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला आहे. तसेच कर्नाटकमधील तपास यंत्रणांनी केलेल्या छापेमारीमध्ये कर्नाटकातील काही ठेकेदारांच्या घरामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडल्याचे नुकतेच उघड झाले आहे. हे प्रकरण अत्यंत लाजिरवाणे असून मतदारांशी केलेली क्रूर थट्टा आहे. मात्र हा काँग्रेसच्या भ्रष्ट डीएनएचा एक लहानसा भाग आहे असे नड्डा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये जे.पी. नड्डा म्हणाले, ”काँग्रेस केवळ लुटीची हमी देऊ शकते. काँग्रेस आणि भ्रष्टाचार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारने त्या राज्यांना भ्रष्टाचाराचे एटीएम बनवले आहे. लोकांचे पैसे लुटण्यासाठी काँग्रेस तेलंगणा आणि मध्य प्रदेशला देखील या प्रकारचे एटीएम बनवू इच्छित आहे.”

हेही वाचा : “१८ वर्षांच्या सत्ता काळात युवा पिढी…”; काँग्रेसची शिवराज सिंह सरकारवर जोरदार टीका

कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच काँग्रेसची हमी केवळ भ्रष्टाचार अशी आहे असा आरोप जे.पी. नड्डा यांनी केला. दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमधील एक ठेकेदार, त्याचा मुलगा आणि जिम प्रशिक्षक तसेच आर्किटेक्टसह अनेक लोकांशी संबंधित असलेल्या परिसरांमध्ये छापेमारी करून मोठी रक्कम जप्त केली आहे.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार स्पर्धा होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये भाजपा काँग्रेससह भारत राष्ट्र समिती पक्ष देखील प्रबळ दावेदार असणार आहे. आगामी पाच राज्यांच्य विधानसभा निवडणुका या केंद्रामध्ये सत्तेत असणारे भाजपा सरकार आणि काँग्रेस पक्षासाठी एक प्रकारची सेमी फायनल असल्याचे म्हटले जात आहे.