सरकार स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज भासेल, असे विश्लेषण भाजप सरचिटणीस राम माधव यांनी एका मुलाखतीत केले आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताचा आकडा सहज पार करेल,  असा विश्वास माधव यांनी व्यक्त केला.

उत्तरेकडील राज्यात भाजपचे जे संभाव्य नुकसान होईल ते ईशान्येकडील राज्ये तसेच ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये भरून काढले जाईल, असा दावा त्यांनी केला. सत्तेत आल्यावर भाजप विकासाचे धोरण कायम ठेवेल तसेच आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमापासून दूर हटणार नाही, अशी ग्वाही माधव यांनी दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये यावेळी भाजपची खूपच चांगली कामगिरी होईल. असेच प्रयत्न दक्षिणेकडील राज्यांमध्ये केले असते तर बहुमताच्या दृष्टीने सुरक्षित संख्याबळ गाठले असते. गेल्या वेळी आम्ही जी कामगिरी केली त्याची पुनरावृत्ती यावेळी सत्ताविरोधी भावनेमुळे काही प्रमाणात शक्य नसल्याची कबुली त्यांनी दिली. पाकिस्तान-भारत संबंध ताणलेले असताना शेजारी देशाने दहशतवादाशी लढण्याबाबत प्रामाणिक हवे. तरच काही तरी साध्य होईल. शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व इम्रान खान एकत्र येणार आहेत. त्यामुळे ठोस कृती केल्यास पुढे जाता येईल, असे माधव यांनी सांगितले.