देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपाने ४ पैकी ३ राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आणि काँग्रेसला धक्का दिला. या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. तसेच त्यावरून सडकून टीका केली. ते रविवारी (३ डिसेंबर) दिल्लीत भाजपा मुख्यालयात बोलत होते.
जे. पी. नड्डा म्हणाले, “या निवडणुकींच्या निकालांनी हा संदेश दिला आहे की, मोदीच देशाला मजबूत करू शकतात. निवडणुकीच्या निकालाने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदिवासी यांना मोदीच मुख्य प्रवाहात आणू शकतात.”
“काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवरील वक्तव्ये”
“या निवडणुकीत काँग्रेसच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवरील वक्तव्ये केली. ही वक्तव्ये केवळ खालच्या पातळीची नाही, तर असंसदीयही होते. काँग्रेसच्या नेत्यांनी अशी टीका केली, जिचा सार्वजनिक ठिकाणी पुनरुच्चारही करता येत नाही,” असं मत जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live : भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब
“मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवीगाळ करणं हे विरोधकांना…”
“मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवी देणं आहे हे त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का?” असा प्रश्न विचारत नड्डांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.