तीन वर्षांपूर्वी, अर्थात २०२१ मध्ये झालेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. स्थानिक खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरलं होतं. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेलीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवार महेश गावित यांचा तब्बल ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला होता. आता त्याच कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपाच्या दुसऱ्या यादीत आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
भारतीय जनता पक्षानं बुधवारी लोकसभा निवडणुकांसाठीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये पहिलंच नाव कलाबेन डेलकर यांचं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर कलाबेन डेलकर या उद्धव ठाकरे गटासोबतच राहिल्या होत्या. त्यांच्या रुपाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिल्या महिला खासदार मिळाल्या होत्या. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाची कोणतीही जाहीर माहिती वा कार्यक्रम न करता थेट त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करून भाजपानं शिवसेनेच्या दोन्ही गटांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन व ही लोकसभा जागा जिंकून त्यांना अर्पण करेन”, अशी प्रतिक्रिया उमेदवारीनंतर कलाबेन डेलकर यांनी दिली आहे.
२०२१ चा मोठा विजय!
२२ फेब्रुवारी २०२१ रोजी दादरा-नगर हवेलीचे तत्कालीन खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ‘सी ग्रीन साऊथ’ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत एक चिठ्ठीही लिहून ठेवल्याचं सांगितलं गेलं. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या पोटनिवडणुका घेण्यात आल्यामुळे त्यांचं ठाकरे गटाच्या दृष्टीने महत्त्व वाढलं होतं.
“महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झालंय”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “४८ मतदारसंघांची यादी…”
या पोटनिवडणुकीत कलाबेन यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षानं महेश गावित यांना उमेदवारी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली होती. त्यामुळे ५० हजारांहून अधिक मताधिक्याने कलाबेन डेलकर विजयी झाल्या होत्या.
पक्षप्रवेशाची कोणतीही घोषणा नाही!
दरम्यान, कलाबेन डेलकर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे गटासोबत असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा कार्यक्रमही न करता भाजपानं थेट यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. याबाबत गुरुवारी सकाळी माध्यमांनी विचारणा केली असता उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपाच्या यादीत आहे. तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. त्या संकटात असताना त्या कुटुंबाला शिवसेनेनंच साथ दिली. अशा स्थितीत त्या कुटुंबाला इमान नसेल, निष्ठा नसेल तर बघू”, असं ते म्हणाले.