UP Lok Sabha Election 2024 Results : उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७० जागा जिंकू असा आत्मविश्वास भाजपाला होता. २०१४ आणि २०१९ साली भाजपाने याठिकाणी मोठा विजय मिळविला होता. यावेळी अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करून देशभरात त्याचा प्रचार करण्यात आला. मात्र आता उत्तर प्रदेशमध्येच भाजपाला मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे ३७ आमदार आघाडीवर आहेत. तर भाजपा ३३ ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसने सात जागांवर आघाडी मिळवली आहे. तर तीन जागांवर आझाद समाज पार्टी, राष्ट्रीय लोक दल आणि एका जागेवर अपना दलाचे उमेदवार पुढे आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का, इंडिया आघाडीला ४२ जागांवर आघाडी
अयोध्येबाबत धक्कादायक निकाल येत आहेत. अयोध्या शहर हे फैजाबाद मतदारसंघात मोडते. फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद आघाडीवर असून त्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत २,५१,२९१ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांना २,४०,०८८ मते मिळाली आहेत. लल्लू सिंह हे तब्बल ११ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये यंदादेखील भाजपाचं वर्चस्व असेल असा दावा अनेक एक्झिट पोल्समध्ये करण्यात आला होता. हे राज्य गेल्या १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ६२ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी भाजपाला ६० ते ७५ जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेले निकाल हे एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा वेगळे आहेत.