Chhattisgarh Assembly Elections 2023 : तीन दिवसांनी छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान (७ नोव्हेंबर) पार पडणार आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (दि. ३ नोव्हेंबर) भाजपाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आधीपासूनच असलेल्या काही आश्वासनांना भाजपाच्या जाहीरनाम्यात जागा देण्यात आली आहे. जसे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी, केजी ते पीजी मोफत शिक्षण. भाजपाचा जाहीरनामा सत्ताधारी काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी साधर्म्य दाखवणारा असून त्याही पुढे जाऊन भाजपाने अनेक आश्वासने दिली आहेत. भाजपाच्या जाहीरनाम्यात २० “मोदी गॅरंटी” देण्यात आल्या आहेत. यावरून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एक्सवर पोस्ट टाकून भाजपाच्या जाहीरनाम्यावर टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी आमच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना रेवडी म्हणणाऱ्या भाजपाने त्याच आश्वासनांना त्यांच्या जाहीरनाम्यात कॉपी केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
जाहीरनाम्यातील महत्त्वाचे १० मुद्दे :
१. भाजपाने काँग्रेसपेक्षा एक पाऊल पुढे टाकून प्रति एकर २१ क्विंटल धानासाठी ३,१०० रुपये एकरकमी देण्याचे आश्वासन दिले आहे, तर काँग्रेसने हे पैसे चार हप्त्यात देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने प्रति एकर २० क्विंटल धान ३००० रुपयांना खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काँग्रेसप्रमाणेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. छत्तीसगडला ‘धान का कटोरा’ असे म्हटले जाते. राज्यात २७.७ नोंदणीकृत तांदूळ शेतकरी आहेत आणि या व्यवसायावर आधारित लाखो मजूर, प्रक्रिया आणि वाहतूक करणारे इतर लोक आहेत. २.५४ कोटी लोकसंख्येपैकी ९० लाख लोकसंख्या या व्यवसायाशी निगडित आहे.
२. विवाहित महिलांसाठी वार्षिक १२,००० रुपये देण्याचे वचन देण्यात आले आहे. २०१८ साली मतदान करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय होती. पुरुषांच्या संख्येइतकेच महिलांचेही मतदान झाले होते.
३. सरकारी विभागात रिक्त असलेल्या एक लाख पदांवर नोकरभरती करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला जाईल, असेही आश्वासन भाजपाने दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासाठी आपल्या भाषणात दोन वर्षांचा कालावधी सांगितला असला तरी जाहीरनाम्यात मात्र यासाठी काही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही.
४. राज्यातील १८ लाख गरीब लोकांना आवास योजनेचा (गृह) लाभ मिळेल. काँग्रेसने १७.५ लाख लोकांना आवास योजनेचा लाभ मिळेल, असे आश्वासन दिले आहे. अमित शाह यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी मागच्या पाच वर्षात आवास योजनेची अंमलबजावणी केली नाही. कारण ही केंद्राची योजना असून त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये, यासाठी त्यांनी लोकांना लाभ मिळू दिला नाही. तसेच पुढील दोन वर्षात प्रत्येक घरासाठी नळ जोडणी केली जाईल, असेही आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले.
५. तेंदू पत्त्याच्या प्रति गोणीला ५,५०० रुपयांचा भाव दिला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. विद्यमान दरापेक्षा एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच तेंदू पत्ता गोळा करण्यासाठी १५ दिवसांची वाढ देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने तेंदू पत्ता गोळा करणाऱ्या कुटुंबाला ४००० रुपयांचा वार्षिक बोनस जाहीर केला आहे. भाजपाने ४,५०० रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. तेंदू पत्ता आदिवासींसाठी हिरवे सोने मानले जाते. राज्यात २९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. आदिवासी जमातीची लोकसंख्या ७८.२३ लाख एवढी आहे.
६. जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना १०,००० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हेच आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २९ ऑक्टोबर रोजी कवर्धा येथे घेतलेल्या जाहीर सभेत दिले होते. शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले जाणारे ७००० अनुदान वाढवून ते १०,००० केले होते.
७. १० लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली असून रास्त दरात औषधे उपलब्ध करून देणारी आणखी ५०० केंद्रे उघडण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्षानेही अशाच प्रकारची एक घोषणा केलेली आहे.
८. लोकसेवा आयोगामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच यूपीएससी परीक्षेची पद्धत बदलणार असल्याचेही सांगितले आहे. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये भूपेश बघेल यांनी अशाच प्रकारचे एक विधान केले होते.
९. तरुणांनी उद्यमशीलतेकडे वळावे यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येईल, तसेच व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणाही भाजपाने केली आहे.
१०. ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रियांका गांधी यांनीही ३० ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारची घोषणा केली होती.
जुनी पेन्शन योजना, दिल्ली-एनसीआरच्या धर्तीवर चार शहरांचा विकास, इनोव्हेशन हब तयार करणे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यास तिला १.५ लाख रुपयांचे अनुदान आणि विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्रवास भत्ता देणे अशाही प्रकारची इतर आश्वासने देण्यात आली आहेत.