मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील निवडणुकांचा कौल समोर आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार येथे भाजपा सत्तेच्या गादीवर बसणार असल्याची शक्यता आहे. मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपाच्या अनेक मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपाच्या यशाबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. पोस्टमधून त्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स पोस्टमध्ये म्हणाले, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. जनतेचा विश्वास भाजपावर आहे. या सर्व राज्यातील कुटुंबीयांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो.
हेही वाचा >> “पनवती कोण आहे ते काँग्रेसला कळलं असेल त्यामुळे आता…”, निवडणूक निकालांवर फडणवीस काय म्हणाले?
“मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू. त्यानिमित्त पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपाची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच”, असंही मोदी म्हणाले.
“विकसित भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचे आहे. आज आम्ही एकत्रितपणे या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, चारपैकी तीन राज्यांत भाजपाला घवघवीत यश मिळत असल्याचं स्पष्ट झालेलं असताना तेलंगणामध्ये मात्र वेगळं चित्र आहे. तेलंगणात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर, बीरआएस काँग्रेसच्या पिछाडीवर आहे. तसंच, भाजपा दुहेरी आकडाही ओलांडू शकलेला नाही. त्यामुळे तेलंगणातील अपयशाबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
हेही वाचा >> वसुंधरा राजे पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनतील? काय आहेत राजकीय समीकरणं?
तेलंगणातील माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, भाजपाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या काही वर्षांमध्ये हा पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही मी कौतुक करतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
चारही राज्यात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही वेळातच कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचा विजय झाला, याची अधिकृतरित्या माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिली जाईल.