लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता भाजपाला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशात आशुतोष या राजकीय विश्लेषकांनी भाजपाला बहुमत मिळणं कठीण आहे असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे त्यामागची कारणंही सांगितली आहेत. महत्त्वाचे मानले जाणारे एक्झिट पोल हे मोदीच पंतप्रधान होतील असं म्हणत आहेत. मात्र विश्लेषक आशुतोष यांनी मात्र हे कठीण असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले आशुतोष?
“दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आपोआप एक विरोधी वातावरणही तयार होतं. सत्तेत राहिल्यानंतर ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं त्यावरुन ही नाराजी तयार होते. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारींना पक्षात घेणं यांसारखे महत्त्वाचे मुद्दे होते. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात न्याय यात्रा काढली यातून लोकांना जाणवलं की त्यांच्यात बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्याच्या घडीला अतिआत्मविश्वासात वावरत आहेत. त्यामुळे भाजपाला बहुमत मिळणं कठीण आहे असं दिसतं आहे.” असं आशुतोष यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हे पण वाचा- संजय राऊत यांचा दावा, “लाडू, पेढे, जिलबी, फाफडा सगळं तयार ठेवलं तरीही भाजपाचा पराभव…”
भाजपाचा प्लॅन ए फेल
“भाजपाचा प्लान ए फेल गेला आहे. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत चालेल असं भाजपाला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. त्यानंतर गॅरंटीचा मुद्दा आणला गेला, तो मुद्दाही म्हणावा तसा चालला नाही. दहा वर्षांत आम्ही काय केलं? दहा वर्षांत काँग्रेसने काय केलं हे सांगणं सुरु झालं. पण मतदारांमध्ये एक प्रकारची नाराजी दिसत होती ती होतीच. या नाराजीला हवा देण्याचं काम विरोधकांनी म्हणजेच इंडिया आघाडीने केलं. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही बोलण्यास सुरुवात केली, तुमची जमीन हिसकावतील, मंगळसूत्र हिसकावतील सारखे मुद्दे भाषणांतून पुढे आणले. त्यामुळे चर्चेत नसलेला काँग्रेसचा जाहीरनामा चर्चेत आला.” असंही मत आशुतोष यांनी मांडलं आहे.
“भाजपाकडे सध्याच्या घडीला प्लॅन बी देखील नाही असं मतही आशुतोष यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. अशात मोदींना ३५० किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. निकालाच्या दिवशी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज येत होते त्यातल्या चर्चांमध्ये काँग्रेसने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जनतेचा कौल आम्हालाच आहे आणि २९५ किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. अशात ४ जूनला काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.