Premium

४० लाख कार्यकर्ते, ४५ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अन् बरंच काही; मध्य प्रदेश जिंकण्यामागे भाजपाची रणनीती काय?

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण २३० जागांपैकी भाजपाने १६३ जागांवर विजय मिळवला आहे; तर काँग्रेसला अवघ्या ६६ जागाच जिंकता आल्या आहेत.

madhya pradesh election result
मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा विजय झाला (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजपाने राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश या राज्यांत एकहाती सत्ता मिळवली आहे. पर्यायाने काँग्रेसला राजस्थान व छत्तीसगड या राज्यांतील सत्ता गमवावी लागली आहे. भाजपाने मध्य प्रदेशमध्ये मिळवलेल्या विजयाची अनेक अर्थांनी चर्चा होत आहे. भाजपाच्या या विजयाचे नेमके गमक काय, असा प्रश्नदेखील विचारण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या मध्य प्रदेशमधील वेगवेगळ्या नेत्यांनी विजयाची कारणे सांगितली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या योजनेमुळेच हा विजय होऊ शकला, असे येथील नेत्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बूथ स्तरावर ४० लाख कार्यकर्ते

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण २३० जागांपैकी भाजपाने १६३ जागांवर विजय मिळवला आहे; तर काँग्रेसला अवघ्या ६६ जागाच जिंकता आल्या आहेत. या दणदणीत विजयाबाबत बोलताना मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी, “मध्य प्रदेशमध्ये साधारण ४० लाख बूथस्तरीय कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या योजनेची अंमलबजावणी केली. याच कारणामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे. राज्यात प्रत्येक बूथवर साधारण ५१ टक्के मते ही भाजपाला मिळाली पाहिजेत, असे अमित शाह यांनी आम्हाला सांगितले होते. साधारण ६४,५२३ बूथवर आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचाच परिणाम म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

बूथस्तरीय समितीस्थापनाचा निर्णय

या विजयासाठी साधारण एक वर्षापासून भाजपाकडून योजना आखली जात होती. गेल्या वर्षभरापासून भाजपाकडून बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना जमा केले जात होते. अमित शाह यांनी सांगितलेल्या योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात होते. जानेवारी २०२२ मध्ये भाजपाने ९५ टक्के बूथवर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच बूथस्तरीय समितीबाबत बोलताना भाजपाचे सचिव रजनीश अग्रवाल यांनी, “बूथस्तरीय समिती स्थापन करताना आम्ही आमच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची माहिती डिजिटली रेकॉर्ड केली. तसेच बूथ स्तरावर आमच्यात रणनीतीवर चर्चा व्हायची. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणे, तसेच या योजनांच्या लाभार्थींशी संपर्क साधणे, अशी कामे आम्ही बूथ स्तरावर केली,” अशी माहिती दिली.

मतदारांना केंद्रातील योजनांची सातत्याने माहिती

“आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थींशी संपर्क साधला. विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींशी आम्ही विशेष रूपाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आमच्या योजनांबद्दल आम्ही त्यांना सतत सांगत राहिलो. हे मतदार जेव्हा मतदान करायला जातील, तेव्हा डोक्यात आमच्याच योजना असाव्यात, असा आमचा उद्देश होता,” असेही अग्रवाल यांनी सांगितले. बूथ स्तरावरील कार्यकर्ते डिजिटली आमच्याशी जोडलेले होते. हे कार्यकर्ते राज्याच्या नेतृत्वाच्या थेट संपर्कात होते. काँग्रेसने निवडणूक एजन्सींना जबाबदारी सोपवून ही निवडणूक लढवली; आम्ही मात्र प्रत्यक्ष काम केले, असेही त्यांनी सांगितले.

पक्षाची विचारधारा समजावी यासाठी कार्यशाळा

भाजपाचा विचारधारा समजावी यासाठी भाजपाने मार्च महिन्यात विशेष कार्यशाळा आयोजित केल्या. २०१८ सालच्या निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांत उत्साह नसल्याचा हा परिणाम होता, असे आमच्या लक्षात आले होते. त्यामुळे या निवडणुकीत बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांत पक्षाची विचारधारा रुजावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी राष्ट्र प्रथम ही विचारधारा समोर ठेवून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम ऐकण्याचे निर्देश

“अयोध्या आणि राम मंदिरामुळे बूथ स्तरावरील कार्यकर्ते एकत्र आले. मात्र, भाजपाचा नेमका उद्देश आणि विचारधारा काय हे या कार्यकर्त्यांना समजणे आवश्यक होते. याच कारणामुळे प्रत्येक रविवारी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकण्यास सांगण्यात आले होते. हा कार्यक्रम ऐकतानाचा एक सेल्फी फोटोदेखील आमच्या अॅपवर पोस्ट करण्याचे निर्देश या कार्यकर्त्यांना देण्यात आले होते,” असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

तब्बल ४५ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

भाजपाचे नेते रमाकांत धाकर यांनीदेखील भाजपाच्या या विजयाचे नेमके कारण काय? याबाबत सविस्तर सांगितले. “आमच्याकडे अनेक महिलांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. या सर्व महिला लाडली बहना या योजनेच्या लाभार्थी होत्या. आम्ही तुमच्या पक्षाच्या विजयासाठी काम करू, असे या महिलांनी स्वत:हून सांगितले होते,” असे धाकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे बूथ स्तरावरील कार्यकर्ते एकाकी पडणार नाहीत याचीही भाजपाने काळजी घेतली. त्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातील बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जायच्या. त्यांना जेवण दिले जायचे. वेगवेगळे खेळ आयोजित केले जायचे; ज्यामुळे बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांतील स्पर्धा कमी झाली. या बैठकांमध्ये निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जायची. या बैठकांमुळे प्रादेशिक अडथळे दूर झाले. तसेच बूथ स्तरावरील कार्यकर्ते एकत्र राहावेत यासाठी एकूण ४२ हजार व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांत चर्चा व्हायची.

जूनमध्ये घरोघरी प्रचार करण्याचे निर्देश

जून महिन्यात भाजपाने सर्वांत मोठी मोहीम राबवली. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपाने घरोघरी जाऊन लोकांना केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. या काळात भाजपाने बूथविस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कार्यकर्ते एकत्र यायचे. तसेच या कार्यक्रमात निवडणुकीसाठी रणनीती आखली जायची. जूनमधील भोपाळमधल्या अशाच एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनीदेखील भाग घेतला होता. ऑक्टोबर महिन्यात कार्यकर्ता महाकुंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भातील रणनीतीच्या प्रिंटआऊट्स देण्यात आल्या होत्या. तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी करावयाच्या कामांची एक यादी देण्यात आली होती. ज्या भागात भाजपाचे प्राबल्य नाही, त्या भागात अन्य तिसऱ्या उमेदवाराचा विजय कसा होईल? मते कशी फुटतील? याबाबत कार्यकर्त्यांना सांगण्यात आले होते, अशी माहिती भाजपाच्या एका नेत्याने दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp won madhya pradesh assembly election what is strategy behind it know detail information prd

First published on: 04-12-2023 at 11:30 IST
Show comments