कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुतील दक्षिण बंगळुरू या मतदारसंघातून भाजपाचे २८ वर्षीय तेजस्वी सूर्या हे विजयी झाले आहेत. तेजस्वी सूर्या यांनी निवडणुकीतील विजयानंतर बंगळुरुतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.  “मी लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतो. तेच माझे प्रेरणास्थान आहेत”, अशा शब्दात तेजस्वी सूर्या यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण बंगळुरू हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असून १९९१ पासून या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हे तब्बल सहा वेळा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघातून भाजपा अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांना उमेदवारी देणार, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने त्यांच्याऐवजी तेजस्वी सूर्या यांना संधी दिली. सूर्या यांच्यासमोर काँग्रेसने बी के हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली होती. २०१४ मध्ये अनंतकुमार यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि उद्योजक नंदन निलकेणी यांचा पराभव केला होता. तब्बल सव्वा दोन लाख मतांनी निलकेणी पराभूत झाले होते. त्यामुळे यंदा तेजस्वी यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

गुरुवारी झालेल्या मतमोजणीत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा तब्बल ३ लाख ३१ हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात कर्नाटकात आघाडी असून अशा परिस्थितीतही तेजस्वी सूर्या यांनी हा विजय मिळवला. तेजस्वी हे भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस असून सोशल मीडियावर ते सक्रीय आहेत. कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते. आता खासदार म्हणून ते कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून यातील २५ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर काँग्रेस, जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि अपक्ष असे प्रत्येकी एक खासदार निवडून आला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp youngest mp tejasvi surya from bengaluru south who is he