Brahmapuri Assembly Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात येतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाला राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. युती असो की आघाडी, या दोघांनीही ब्रह्मपुरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचे चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊ.
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ साली झालेल्या परिसीमनानुसार, ब्रह्मपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व सिंदेवाही हे तालुके, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या अतुल देशकर यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला.
हेही वाचा- आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
१९६२ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर जवळपास १९८५ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या गोविंद मेश्राम यांनी विजय मिळवला होता. तर, १९६७ साली बळीराम गुरपुडे हे या मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर बाबूराव भेंडारकर, सुरेश खानोरकर या काँग्रेसच्या आमदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, १९९० साली शिवसेनेच्या नामदेव धानोडकर यांनी विजय मिळवला. पुढे १९९५ साली सुरेश खानोरकर यांनी पुन्हा विजय मिळवला; पण त्यावेळी त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तसेच १९९९ साली भाजपाच्या उद्धवराव शिंगाडे यांनी विजय मिळवला. २००४ ते २००९ पर्यंत भाजपाच्या अतुल देशकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
२०१४ आणि २०१९ ची आकडेवारी काय सांगते?
२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी एकहाती विजय मिळवला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण ७० हजार ३७३ मते होती; तर भाजपाच्या अतुल देशकर यांना ५६ हजार ७६३ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांना ९६ हजार ७२६; तर अतुल देशकर यांना ७८ हजार १७७ मते मिळाली होती. यापूर्वी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशकर यांनी काँग्रेसच्या पंकज गुड्डेवार यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत देशकर यांना ५० हजार ३४०; तर गुड्डेवार यांना ३० हजार २६५ मते मिळाली होती.
या मतदारसंघातील सद्य:स्थिती काय?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, यावेळी विजय वडेट्टीवार यांना भाजपाबरोबर पक्षातील अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील पक्षांतर्गत वर्चस्वाचा वाद अनेकदा बघायला मिळाला आहे.
हेही वाचा – Prakash Ambedkar : ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांच्या समर्थकांनी ब्रह्मपुरी येथे कुणबी अधिवेशन घेतले होते. त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांना लक्ष्य केले होते. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मेळाव्यात मतदारसंघामध्ये बहुसंख्य कुणबी असताना अल्पसंख्याक व्यक्ती (वडेट्टीवार) या मतदारसंघाचे नेतृत्व कसे काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे हे चित्र बदलण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे वडेट्टीवारांना काँग्रेसच्या नेत्यांकडूनच घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपाकडून कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती व उपाध्यक्ष अशी राजकीय कारकिर्द असलेले सहारे कुणबी समाजातून येतात. सहारे आमदार बंटी भांगडीया यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विजय वडेट्टीवार विरुद्ध कृष्णलाल सहारे अशी थेट लढत होणार आहे.