ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ : विजय वडेट्टीवारांना पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसणार?

या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचे चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊ.

brahmapuri assembly constituency
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात येतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाला राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. युती असो की आघाडी, या दोघांनीही ब्रह्मपुरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचे चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊ.

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ साली झालेल्या परिसीमनानुसार, ब्रह्मपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व सिंदेवाही हे तालुके, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या अतुल देशकर यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला.

हेही वाचा – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ : सुधीर मुनगंटीवारांसमोरील आव्हानं ते काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, कशी आहे मतदारसंघाची सद्यस्थिती?

१९६२ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर जवळपास १९८५ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या गोविंद मेश्राम यांनी विजय मिळवला होता. तर, १९६७ साली बळीराम गुरपुडे हे या मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर बाबूराव भेंडारकर, सुरेश खानोरकर या काँग्रेसच्या आमदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, १९९० साली शिवसेनेच्या नामदेव धानोडकर यांनी विजय मिळवला. पुढे १९९५ साली सुरेश खानोरकर यांनी पुन्हा विजय मिळवला; पण त्यावेळी त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तसेच १९९९ साली भाजपाच्या उद्धवराव शिंगाडे यांनी विजय मिळवला. २००४ ते २००९ पर्यंत भाजपाच्या अतुल देशकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

२०१४ आणि २०१९ ची आकडेवारी काय सांगते?

२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी एकहाती विजय मिळवला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण ७० हजार ३७३ मते होती; तर भाजपाच्या अतुल देशकर यांना ५६ हजार ७६३ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांना ९६ हजार ७२६; तर अतुल देशकर यांना ७८ हजार १७७ मते मिळाली होती. यापूर्वी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशकर यांनी काँग्रेसच्या पंकज गुड्डेवार यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत देशकर यांना ५० हजार ३४०; तर गुड्डेवार यांना ३० हजार २६५ मते मिळाली होती.

या मतदारसंघातील सद्य:स्थिती काय?

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नसले तरी हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे उमदेवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, यावेळी विजय वडेट्टीवार यांना भाजपाबरोबर पक्षातील अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील पक्षांतर्गत वर्चस्वाचा वाद अनेकदा बघायला मिळाला आहे.

हेही वाचा – पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांमुळे निवडणूक आयुक्त निराश; नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांच्या समर्थकांनी ब्रह्मपुरी येथे कुणबी अधिवेशन घेतले होते. त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांना लक्ष्य केले होते. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मेळाव्यात मतदारसंघामध्ये बहुसंख्य कुणबी असताना अल्पसंख्याक व्यक्ती (वडेट्टीवार) या मतदारसंघाचे नेतृत्व कसे काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे हे चित्र बदलण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे वडेट्टीवारांना काँग्रेसच्या नेत्यांकडूनच घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्याशिवाय भाजपाकडून अतुल देशकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलाताना अतुल देशकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहावे, असा हा संदेश भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. हे म्हणत एक प्रकारे त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. असे असले तरी ब्रह्मपुरी मतदारसंघातील जातीय समीकरण बघता, भाजपाकडून कुणबी उमेदवार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. एकंदरीतच ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार विरुद्ध अतुल देशकर सामना रंगणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brahmapuri assembly constituency political history 2019 result sudhir mungantiwar spb

First published on: 15-10-2024 at 18:22 IST
Show comments