Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जुलाना विधानसभेच्या उमेदवार विनेश फोगटचा दणदणीत विजय झाला असून तिने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. विनेशच्या या विजयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनीही विनेश फोगटच्या विजयावर भाष्य केलं आहे. ‘आज तक’ या वृत्तावाहिनीशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले ब्रिजभूषण सिंह?

“हरियाणात भाजपाचं सरकार बनणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी मी हरियाणातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. या निवडणुकीत काँग्रेसने शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही”, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

हेही वाचा – Haryana Assembly Election Result 2024 Live : हरियाणात भाजपाची ५० तर काँग्रेसची ३४ जागांची आघाडी; पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

“विनेश फोगट नायक नाही खलनायक”

विनेश फोगटच्या विजयाबाबत विचारलं असता, “या निवडणुकीत ज्या कुस्तीपटूचा विजय झाला आहे, ती नायक नाही, तर खलनायक आहे. तिने या निवडणुकीत विजय मिळवला असला, तरी तिच्यामुळे हरियाणात काँग्रेसचा सत्यानाश झाला आहे. ती कुस्तीही बेईमानी करून जिंकत होती. आता निवडणूकही बेईमानी करून जिंकली आहे”, अशी टीका त्यांनी केली.

एकूण १२ उमेदवार होते रिंगणात

दरम्यान, हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातमधून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगटला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत विनेश फोगटने भाजपाच्या योगेश बैरागी यांच्यावर मात करत मोठा विजय मिळवला. भाजपाने एक दलित चेहरा म्हणून कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. तर इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण १२ उमेदवार रिंगणात होते.

विनेश फोगटचा दणदणीत विजय

निकालाच्या मतमोजणीच्या १४व्या फेरीमध्ये विनेश फोगट जुलानामधून ५ हजार ५५७ मतांनी आघाडीवर होती. अखेर विनेश फोगटचा दणदणीत विजय झाला. २००५ नंतर जवळपास १९ वर्षांनी जुलानामधून विनेश फोगटच्या रुपाने काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे.

हेही वाचा – हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं…

विजयानंतर काय म्हणाली विनेश फोगट?

या विजयानंतर विनेश फोगटनेही प्रतिक्रिया दिली आहे. “हा प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा विजय आहे, जी नेहमी संघर्षाचा मार्ग निवडते. या जुलानामधील जनतेने मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांची आभारी आहे. अद्याप सर्व जागांचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत. आता मी राजकारणात राहणार असून जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे”, असं ती म्हणाली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan singh reaction after vinesh phogat victory in haryana assembly poll results spb