लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात स्पष्ट होतील. सध्या देशात इंडिया आघाडी २२३ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ३०१ जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. कैसरगंज लोकसभा मतदारसंघात करण भूषण सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.
कैसरगंज लोकसभा मतदारसंघात करण भूषण सिंह यांना तब्बल ५ लाख ७१ हजार मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधातील समाजवादी पार्टीचे उमेदवार भगत राम यांना ४ लाख २२ हजार मतं मिळाली आहेत. म्हणजेच करण भूषण सिंह यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. विद्यमान खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारले होते. त्यामुळे कैसरगंज लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता.
हेही वाचा : “मी दाव्यानिशी सांगतो की…” मतमोजणीदरम्यान संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “सरकार बनवण्यासाठी…”
भारतीय जनता पार्टीने ब्रिजभूषण सिंह यांना तिकीट नाकारून त्यांचे चिरंजीव करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान कैसरगंज या मतदारसंघात ब्रिजभूषण सिंह यांनी वर्चस्व राखलं आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिल्याचं दिसून येत आहे. कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांनी कैसरगंज मतदारसंघात तब्बल ५ लाख ७१ हजार ६७२ मते मिळवत वडिलांचं मतदारसंघावर असणार वर्चस्व मुलाने कायम राखलं आहे.
त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार भगत राम यांना ४ लाख २२ हजार मते मिळाली आहेत. तसेच दुसरे उमेदवार नरेंद्र पांडे यांना ४३०७३ मते मिळाली आहेत. दरम्यान, करण भूषण सिंह हे डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिलेले आहेत. करण भूषण सिंह यांनी बीबीए आणि एलएलबीत पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. यासोबतच त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केलेला आहे. तसेच ते उत्तर प्रदेश कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि ग्राम विकास सहकारी बँकेचे ते चेअरमन देखील आहेत.