Lok Sabha bypolls: वायनाड आणि नांदेडमध्ये पोटनिवडणूक जाहीर; प्रियांका गांधी लोकसभेत एंट्री घेणार, काँग्रेस नांदेडचा गड राखणार?

Lok Sabha Bypolls to Wayanad and Nanded: वायनाड आणि नांदेड या काँग्रेसच्या दोन जागा कमी झाल्या होत्या. आता याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

Wayanad and Nanded Lok Sabha bypolls 2024 date
वायनाड आणि नांदेडमध्ये काँग्रेस पुन्हा जिंकणार?

Lok Sabha Bypolls to Wayanad and Nanded: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने तीन लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. केरळमधील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड आणि पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात निवडणूक घेतली जाणार आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड येथून विजय मिळवल्यानंतर त्यांनी वायनाडचा राजीनामा दिला होता. तसेच नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाल्यामुळे ही जागाही रिकामी झाली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधील तृणमूल काँग्रेसचे हाजी शेख नुरूल इस्लाम यांचा मृत्यू झाल्यामुळे याठिकाणीही पुन्हा मतदान होणार आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवितील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या निर्णयामुळे प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर लोकांना उद्देशून म्हटले होते की, “तुम्हाला आता दोन खासदार मिळणार आहेत. मी वरचेवर येत राहीन. वायनाडमधील लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांनीच मला खडतर काळात लढण्याची उर्जा दिली.”

हे वाचा >> ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला

प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या की, “राहुलची अनुपस्थिती मी वायनाडकरांना भासू देणार नाही. वायनाडमधील लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि एक चांगली लोकप्रतिनिधी होण्यासाठी मी कष्ट घेईन.”

वायनाडमधून प्रियांका गांधी का?

वायनाडबरोबर आपले भावनिक संबंध असल्याचा दावा राहुल गांधींनी याआधी वारंवार केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत खराब कामगिरी केली होती आणि स्वत: राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले होते, तेव्हा केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघानेच राहुल गांधींना तारले होते. त्यावेळी केरळमधील काही काँग्रेस नेत्यांनीदेखील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये इतके यश मिळण्यामागे राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवणे हे कारण असल्याचे म्हटले होते. मात्र, तरीही त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे २०२१ मधील केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला फटका बसला होता. काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि माकपच्या नेतृत्वातील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट या दोघांमधील लढतीमध्ये मल्याळम लोकांनी पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटलाच सत्तेवर बसवले होते.

हे ही वाचा >> Jharkhand Assembly Election 2024 Date Announced: झारखंडची निवडणूक कधी? दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण काय?

सध्या केरळ काँग्रेसला असा विश्वास आहे की, सत्ताधारी पिनाराई विजयन सरकारविरोधात जनमताचा कौल असून लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. अशा पार्श्वभूमीवर जर राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडून देण्याचा निर्णय घेतला तर विरोधक नक्कीच या मुद्द्याचे भांडवल करतील. याआधीही राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडून जातील, अशा प्रकारचा प्रचार विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच पक्षाचा केरळमधील जनाधार गमावला जाऊ नये, यासाठी प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्याची चतुर खेळी काँग्रेसने केली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसने वा गांधी घराण्याने वायनाड मतदारसंघाला काम झाल्यावर वाऱ्यावर सोडून दिले, ही भावना विकसित होणार नाही आणि विरोधकांनाही त्या मुद्द्याला खतपाणी घालून राजकीय इप्सित साध्य करता येणार नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bypolls to wayanad and nanded lok sabha seat on november 13 and november 20 respectively results on november 23 kvg

First published on: 15-10-2024 at 16:31 IST
Show comments