नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी, सोमवारी केंद्रीय मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मतमोजणीमध्ये कोणताही गैरप्रकार वा अनियमितता होणार नाही’, अशी ग्वाही दिली. तसेच केंद्रीय आयोगाच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्याचा ‘पॅटर्न’ असून जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोपही केला.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाले असून मंगळवारी देशभरातील ५४१ मतदारसंघांमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीपूर्वी कधीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली गेली नव्हती. मात्र, शनिवारी ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात ‘इंडिया’च्या नेत्यांनी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतमोजणीबाबत शंका घेणारे मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर आयोगाने पत्रकार परिषद घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टूलकीटम्हणणार नाही, पण…

देशातील निवडणुका निष्पक्ष होत नसल्याचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावर करण्यामागे निश्चित स्वरूपाचे कारस्थान आहे. मी या कारस्थानाला ‘टूलकीट’ असे म्हणणार नाही. मात्र, आयोगावर अविश्वास दाखवणे, शंका घेणे हा नियोजित कटाचा भाग असू शकतो, असा दावा राजीव कुमार यांनी केला. मतदानपद्धतीवर शंका घेतली गेली, त्यानंतर निवडणूक यंत्रांबाबत साशंकता व्यक्त केली गेली. मतदानाच्या चार दिवसाआधी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा एक ‘पॅटर्न’ दिसतो, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदवले. या विरोधात अधिक क्षमतेने लढावे लागेल, असे राजीव कुमार म्हणाले.

हेही वाचा >>> “भाजपाला बहुमत मिळणं कठीण, कारण…”, ‘या’ राजकीय विश्लेषकाचं मत चर्चेत

टपाल मतमोजणी: संदिग्धता कायम

टपालाद्वारे झालेल्या मतांची मोजणी मतदान यंत्रांच्या मतमोजणीआधी पूर्ण झाली पाहिजे, अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आयोगाला केली आहे. नियमाप्रमाणे मतदान यंत्रांतील मतांच्या मोजणीआधी ३० मिनिटे टपालमतांची मोजणी सुरू होत असली तरी, ती मतदान यंत्रांतील मतमोजणी झाली तरी सुरू राहते. त्याआधी निकाल जाहीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे टपालमतांची मोजणी पूर्ण झाल्यावर मतदानयंत्रांतील मतांची मोजणी करावी अशी सूचना ‘इंडिया’ आघाडीने केली आहे. मात्र, त्यावर मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मौन बाळगले. टपालमतांची मोजणी अर्धातास आधी सुरू होईल, असे आयुक्तांनी सांगितले.

सुरत प्रकरण : आम्ही काय करणार?

सुरत मतदारसंघामध्ये भाजपेतर सर्व उमेदवारांनी स्वत:हून अर्ज मागे घेतला तर निवडणूक आयोग काय करणार? अर्ज बळजबरीने मागे घ्यायला लावला असेल तर आम्ही हस्तक्षेप केला असता, असे स्पष्टीकरण आयुक्त राजीवकुमार यांनी दिले. सुरतमध्ये रिंगणात एकच उमेदवार असल्याने निवडणूक घेता आली नाही. लोकशाहीमध्ये ही परिस्थिती योग्य नसली तरी कायद्यानुसार आयोगाने निर्णय घेतला असल्याचे राजीव कुमार म्हणाले. मतदारांसाठी ‘नोटा’ हा पर्याय असल्याने मतदानाची प्रक्रिया झाली पाहिजे, असा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

आकडेवारी वेळेवरच…

मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात दिरंगाई झालेली नाही. मतटक्क्यांचा आकडा सगळ्यांसाठी उपलब्ध होता. अंतिम मतटक्का देण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागतो. त्या मुदतीमध्येच सर्व टप्प्यांतील मतटक्क्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आल्याचा दावाही आयुक्तांनी केला. पहिल्या दोन टप्प्यांतील मतटक्क्यांचा आकडा मतदानानंतर ११ दिवसांनी जाहीर केला गेला, त्यानंतर विरोधकांनी आयोगावर तीव्र टीका केली होती. या मुद्द्यावर मात्र आयुक्तांनी मौन बाळगले.

निवडणुका एप्रिलमध्ये घेऊ!

यंदा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यास दीड महिना लागला. संपूर्ण मे महिन्याच्या असह्य उकाड्यात आणि उष्णतेच्या लाटेत मतदान झाले. त्याचा मतदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यातून आयोगाने धडा घेतला असून यापुढे निवडणुका एप्रिलमध्ये महिनाभरात पूर्ण केल्या जातील, असे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव नाही! मतमोजणीची प्रक्रिया निर्दोष असून त्यामध्ये गैरप्रकार होण्याची कोणतीही शक्यता नाही. मतमोजणीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दबाव आणला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि दिशाहीन आहे, असे स्पष्टीकरण राजीव कुमार यांनी दिले. काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जिल्हाधिऱ्यांशी संपर्क साधल्याचा दावा ‘एक्स’वरून केला होता. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने रमेश यांना नोटीस पाठवली असून पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक आरोप झाले असून या हल्ल्यांपासून आयोगाला स्वत:चा बचाव करता आला नाही. पण आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असा पुनरुच्चार राजीव कुमार यांनी केला.