शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘शिवसंकल्प निर्धार मेळाव्या’ला मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात भाजपाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. मात्र ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या पक्षप्रवेशावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले, “आम्ही राजू शिंदे यांना सांगितलं होतं की, तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या आधी या. मात्र ते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपातच थांबले आणि त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मदत केली. तसेच शिंदे यांनी भुमरेंना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यास मदतही केली.”

‘शिवसंकल्प निर्धार मेळाव्या’ची तयारी चालू असताना प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केली. यावेळी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारण्यात आला की राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर तुम्ही नाराज आहात का? यावर उत्तर देताना खैरे म्हणाले, “नाही, मी नाराज नाही. परंतु आम्ही शिंदे यांना सांगत होतो की तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या पक्षात या, त्याचा आमच्या पक्षालाही फायदा होईल. परंतु, ते निवडणुकीच्या काळात तिकडेच थांबले, त्याचा महायुतीला फायदा झाला आणि माझा तोटा झाला. पक्षालाही नुकसान सहन करावं लागलं. त्यांच्यामुळे मी दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालो. आता ते आमच्या पक्षात आले आहेत तर काहीतरी चांगलं काम करतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.”

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी, अशी मागणी खैरे समर्थक आणि जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. अशातच राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने या मतदारसंघासाठी भाजपामधून उमेदवार आयात केल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, “उमेदवारी कोणाला द्यायची हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. ते योग्य निर्णय घेतील.”

माजी खासदार खैरे म्हणाले, “मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी काही निवडणुका जिंकल्या, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला. जयपराजय होतच असतो. तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळतं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते, तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणारच. मला तुला मंत्री करायचं नसेल, खासदार करायचं नसेल तरी देखील ती गोष्ट तुझ्या नशिबात असेल तर ती तुला मिळणारच. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही, निवडून आलो नाही, तरी मी पक्षाचं काम करत राहणार. शिवसेनेचा नेता आणि कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढीसाठी काम करत राहणार.”

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी, बाहेर आल्यानंतर कारणही सांगितलं; म्हणाल्या, “मी आज..”

चंद्रकांत खैरे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवण्यास मी सध्या इच्छुक नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी नक्कीच ही निवडणूक लढवेन. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला विचारलं की त्या गद्दाराला कोण पाडू शकतो? तर मी नक्कीच त्यांना होकार कळवेन. त्याचबरोबर आगामी काळात प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण केलं जाईल, लोकांचं मत जाणून घेतलं जाईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला तर मी ती निवडणूक लढवेन.

Story img Loader