देशभरात उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झालं. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झालं आहे. मणिपूरमधील गोळीबार आणि इतर दोन-तीन ठिकाणी झालेली लहान-मोठी गोंधळाची स्थिती वगळता इतर सर्व ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं. महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील हिंदी सिटी स्कूल मतदान केंद्रावरही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी ती स्थिती योग्यपणे हाताळली आणि गोंधळ थांबवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदी सिटी स्कूल मतदान केंद्रावर चंद्रपूर मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर cancelled (कॅन्सल्ड) असा शिक्का मारला गेल्याने गोंधळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावर हरकत घेत गोंधळ घातला होता. त्यावर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करून खुलासा केला आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, मतदान केंद्राबाहेर लावलेल्या मतपत्रिकेच्या नकल प्रतिवर हा शिक्का मारला गेला होता. वास्तवात अशा प्रत्येक नकल प्रतिवर नियमाप्रमाणे शिक्का मारला जातो. मात्र या मतपत्रिकेवर चुकून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावर हा शिक्का मारला गेला. याबाबत स्थानिक निवडणूक प्रशासनानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. या खुलाशानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे समाधान झालं आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती कुशलतेने हाताळली.

पश्चिम बंगाल, मणिपूरमध्ये हिंसक घटना

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुचीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आणि मतदारांना धमकावल्याचा तृणमूलने आरोप केला आहे. तर मणिपूरमध्ये थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. इरोइसेम्बा मतदान केंद्रावरही हिंसाचार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

त्रिपुरात सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान

दरम्यान, पश्चिम बंगाल व मणिपूरमध्ये काही ठिकाणे वगळता १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडलं. लोकसभेसह सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभेसाठी मोठया प्रमाणवर मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८०.१७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के तर, मणिपूरमध्ये ६९.१३ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये सर्वात कमी ४८.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.