Chembur Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. यावेळी चेंबूर विधानसभा मतदारसंघातील लढत अतिशय रंजक आहे. या मतदारसंघात शिंदे गटातील शिवसेनेचे तुकाराम काटे आणि उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांव्यतिरिक्त एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र यामुळे उमेदवारांना मतांसाठी शेकड्यांवर घासाघीस करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या सहा फेऱ्यांमध्ये एकाही उमेदवारीची गाडी आघाडीच्या दिशेने पुढे जाईना असे चित्र आहे, त्यामुळे चेंबूर विधानसभेत नेमका काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तुकाराम काटे हे त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी आणि परिसरात ग्राउंड होल्डसाठी ओळखले जातात, तर प्रकाश फातर्फेकर हे उद्धव गटाचे तगडे उमेदवार मानले जातात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चेंबूरमध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे १४,७५८ मतांनी आघाडीवर आहेत, तर त्यांच्यानंतर काही फरकाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रकाश फातर्फेकर १४,५१४ मतांवर आहेत; तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दीपकभाऊ निकाळजे, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद भीमराव जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माऊली थोरवे चार ते पाच हजारांवर आहेत.
चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांव्यतिरिक्त एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्षाकडून अनिता किरण पाटोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माऊली थोरवे, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद भीमराव जाधव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दीपकभाऊ निकाळजे. (अ) उतरले होते.
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश वैकुंठ फातर्फेकर चांगल्या मतांनी विजयी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा १९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते.
मुंबईतील चेंबूर ही जागा काँग्रेसने पाच वेळा जिंकली आहे. आतापर्यंत झालेल्या १३ निवडणुकांमध्ये काँग्रेस, भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने ही जागा पाच वेळा जिंकली आहे. २०२४ पर्यंत शिवसेनेने दोनदा, तर भाजपाने तीनदा विजय मिळवला आहे. ही जागा एकदा जनता पक्षाच्या तर एकदा भारतीय जनसंघाच्या खात्यात गेली आहे. काँग्रेस नेते वाडीलाल गांधी हे चेंबूरमधून पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.