Chhagan Bhujbal On Manoj Jarange : गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांचा विरोध आहे. त्यामुळे वर्षभरापासून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दीक चकमक होत असल्याचे पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी येवल्याचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा पराभव करा असे आवाहन केले होते. मात्र, तरीही छगन भुजबळ या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून विजयी झाले. दरम्यान कायमच मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या भुजबळांचे मताधिक्य यंदा मात्र, घटले आहे. हे मताधिक्य का घटले यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
आज माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांना विरोधक ईव्हीएमवर घेत असलेल्या शंकांबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मला सांगा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला ५६-५७ हजारांचे मताधितक्य होते. पण मतदानापूर्वी शेवटच्या दिवशीपर्यंत जरांगे वगेर माझ्या मतदारसंघात रात्री दोन वाजेपर्यंत फिरत राहिले. त्यामुळे जरांगेंच्या आवाहानाला प्रतिसाद मिळाल्याने माझे मताधिक्य यावेळी २६-२७ हजारांपर्यंत खाली आले. पण जर ईव्हीएममध्ये गडबड असती तर मलाही एक लाखांचे मताधिक्य मिळायला पाहिजे होते. माझी मते का कमी झाली मग? कोणावरी तरी पराभवाचे खापर फोडायचे असते, म्हणून ईव्हीएम एक निमित्त आहे.”
येवला मतदारसंघाचा निकाल
नाशिक जिल्ह्यातल येवला मतदारसंघात यंदा छगन भुजबळ यांच्यासमोर राष्ट्रावादीच्या (शरद पवार) मानिकराव शिंदे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत भुजबळ यांना १३१९४५ इतकी मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) मानिकराव शिंदे यांना १०५८८७ इतकी मते मिळाली. यामध्ये छगन भुजबळ यांनी २६०५८ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला. तर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा ५६५२५ इतक्या मतांनी पराभव केला होता.