मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. काल रात्री उशीरा त्यांनी पत्रकार परिषद घेत १३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे म्हटलं. तसेच राज्यातील ज्या मराठा बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यांनी त्यांचे अर्ज आता मागे घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) आमदार छगन भुजबळ यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मनोज जरांगे यांनी जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचं मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना, या निर्णयानंतर देर आये दुरुस्त आये असं आपल्याला म्हणता येईल. एकप्रकारे मनोज जरांगे यांचे म्हणणं योग्यच आहे. एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे बांधव मोकळेपणाने मतदान करतील. सर्व पक्षातून जे उमदेवार उभे आहेत, त्यापैकी ६० ते ७० टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय योग्य आहे, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली.
हेही वाचा – Manoj Jarange Patil in Assembly Election: मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप
यावेळी बोलताना, “आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या, असंही त्यांनी म्हटलं.