Maharashtra Assembly Elections 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून समीर भुजबळ इच्छुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून लवकरच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या चर्चांवर आता मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
छगन भुजबळ हे आज येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी समीर भुजबळ यांच्या अपक्ष लढण्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना समीर भुजबळ हे त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले?
“समीर भुजबळ हे अपक्ष लढणार असल्याची केवळ बातमी आहे. कुणी म्हणतं की समीर भुजबळ हे मशालीवर निवडणूक लढणार, कुणी म्हणतं की तुतारीवर लढणार आहेत. मात्र, समीर भुजबळ अजून कुठेही गेलेले नाहीत. ते आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ते अपक्ष लढणार की नाही, याबाबत त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. मीडियाला काही सांगितलं असेल तर मला काही कल्पना नाही. पण ते आता त्यांच्या निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत”, असं छगन भुजबळ म्हणाले.
येवला मतदारसंघातून विजयाचा व्यक्त केला विश्वास
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “मी १९८५ पासून विधानसभेचा सदस्य आहे. मला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. येवला मतदार संघातील अनेक प्रश्न आज मार्गी लागले आहेत. विकासकामं झाली आहेत. मी निवडणुकीत उभं राहावं ही येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज भरतो आहे. या निवडणुकीत जनता त्यांचा मतरुपी आशीर्वाद नक्कीच देईल”, असे ते म्हणाले.