Kolhapur Lok Sabha Election Result : आज देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस आहे. ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आजचा दिवस सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रात भाजप आघाडीवर आहे त्यापाठोपाठ ठाकरे गट व काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट आहेत.
कोल्हापूरमध्ये निवडणूक लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक रिंगणात आहेत. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे पण कोल्हापूरतच्या जनतेने हे दाखवून दिले की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सर्व तालूक्यातील लोकांनी, सर्व शहरातील लोकांनी भरघोस मतदान हे शाहू महाराजांना केले. ही फक्त सातवी फेरी आहे, जिथे आपण ५० हजार लोकांनी पुढे आलो आहोत. मी मनापासून कोल्हापूरच्या जनतेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी छत्रपती घराण्यावर आपला विश्वास दाखवून दिला”
हेही वाचा : मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत
राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. १९ मे रोजी पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६३.७१ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडला. या दिवशी , बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दुसऱ्या टप्प्यात ६२.७२ टक्के मतदान झाले. तिसरा टप्पा सात मे रोजी झाला असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघात ६३.५५ टक्के मतदारांनी मतदान केले.
१३ मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघांमध्ये एकूण ६२.२१ टक्के मतदारांनी मतदान केले. तर २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान झाले. यावेळी ५६.८९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.