छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ : संजय शिरसाट गड राखणार? कशी आहेत या मतदारसंघातील राजकीय समीकरणं?

या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

Chhatrapati Sambhajinagar West Assembly constituency
संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचा राजकीय इतिहास ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) संजय शिरसाट हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पण एकंदरितच बदललेली राजकीय समीकरणं बघता छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही २००९ च्या फेररचनेनुसार झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघातून संजय शिरसाट यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

२००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२००९ च्या विधानसभा निवडणुकतीत शिवसेनेने संजय शिरसाट यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने चंद्रभान पारखे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत संजय शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना एकूण ५८ हजार ००८ मते मिळाली, तर काँग्रेसच्या चंद्रभान पारखे यांना एकूण ४३ हजार ७९७ मते मिळाली होती. याशिवाय भारीप बहुजन महासंघाचे अमित भुइगल हे ३ हजार ७९१ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

पुढे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संजय शिरसाट निवडून आले. २०१४ मध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपाने मधुकर सावंत यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना ५४ हजार ३५५ मते मिळाली, तर शिरसाट यांना ६१ हजार २८२ मते मिळावी. २०१९ मध्ये संजय शिरसाट आणि अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांच्यात मुख्य लढत झाली. यात संजय शिरसाट यांना ८३ हजार ७९२ मते, तर राजू शिंदे यांना ४३ हजार ३४७ मते मिळाली. याशिवाय एमआयएमचे अरुण बोरडे ३९ हजार ३३६ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून संजय शिरसाट यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र, यंदाची लढत त्यांच्यासाठी सोपी नाही. कारण शिवसेनेच्या फुटीनंतर येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. संजय शिरसाट यांनीही शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून अनेकांनी कंबर कसली आहे. त्यात माजी नगरसेवक राजू शिंदे आघाडीवर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपातून शिवसेनेत ( उद्धव ठाकरे प्रवेश केला आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) त्यांना संधी दिली, तर या मतदारसंघात थेट संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरेदेखील या जागेसाठी इच्छूक असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी तिकीट मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसनेकडून ( उद्धव ठाकरे ) उमदेवारी कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhatrapati sambhajinagar west assembly constituency sanjay shirsat spb

First published on: 18-10-2024 at 23:15 IST
Show comments