छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व मिझोरम या राज्यांत सध्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. साहजिकच पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, सर्वच प्रमुख पक्षांनी या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ साली भाजपाने डिजिटल प्रचार केला. त्याचे परिणाम सर्वच राजकीय पक्षांना दिसले. भाजपाच्या प्रचार झंझावाताने सलग दोन निवडणुकांमध्ये इतर पक्षांचा टिकाव लागला नाही; पण आता इतर पक्षही डिजिटल प्रचाराला तोडीस तोड उत्तर देत आहेत. चित्रपट, त्यातील संवाद आणि प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवर निवडणुकीत प्रचारगीते किंवा जाहिराती तयार केलेल्या पाहिल्या असतील. पण, काही वर्षांत ओटीटी आणि त्यावरील वेब सीरिज इतक्या प्रसिद्ध होत आहेत की, त्याचा प्रभाव आता निवडणुकांवर दिसत आहे. छत्तीसगडच्या निवडणुकीत ॲमेझॉन प्राइमवरील ‘पंचायत’ या वेब सीरिजचा प्रभाव पाहायला मिळाला. या सीरिजमधील भूषण ऊर्फ वनराकस या पात्राच्या तोंडी असलेला “देख रहे हो विनोद” हा संवाद घेऊन छत्तीसगड काँग्रेसने “देख रहे हो प्रमोद…” अशा जाहिराती बनविल्या आहेत; ज्याची ‘कॉपी’ भाजपालाही करावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> BJP Manifesto : ‘आमच्या आश्वासनांना ‘रेवडी’ म्हणणाऱ्या भाजपाने तीच आश्वासने चोरली’, भूपेश बघेल यांची टीका

विधानसभेच्या अवघ्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यातही हायटेक प्रचार पाहायला मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये २० मतदारसंघांत पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. उर्वरित ७० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर प्रचार आणखी शिगेला पोहोचला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधक भाजपाने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. जाहीरनाम्यात जी काही आश्वासने दिली गेली, त्या प्रत्येक आश्वासनाचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. दोन्ही पक्षांच्या ट्विटर हँडल, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर नजर टाकल्यास प्रमुख नेत्यांच्या भाषणांसह क्रिएटिव्ह व्हिडीओ, मीम्सचा अक्षरशः खच पडलेला दिसतो.

काँग्रेसचा हटके प्रचार

छत्तीसगड राज्याची निर्मिती नोव्हेंबर २००० साली स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची तीन वर्षे काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर २००३, २००८ व २०१३ अशा तीनही निवडणुकांत भाजपाने विजय मिळवीत १५ वर्षे सत्ता गाजवली. २०१८ साली काँग्रेसचा विजय झाल्यानंतर भूपेश बघेल मुख्यमंत्री झाले. छत्तीसगडची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न होत असताना काँग्रेसही आपली सत्ता टिकविण्यासाठी हरेक प्रकारे प्रयत्न करीत आहे. सत्ता मिळविण्याची ही लढाई प्रचारात स्पष्टपणे दिसत आहे.

पंचायत वेब सीरिजचा वापर

ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२० साली पंचायत ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. मध्य भारतातल्या एका गावातील ग्रामपंचायतीशी निगडित असलेले कथानक, इरसाल पात्र, खुमासदार संवाद व कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे पंचायत सीरिज चांगलीच लोकप्रिय झाली. हल्लीच या सीरिजचा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. या सीरिजमध्ये भूषण नावाचे एक पात्र असून, त्याच्या तोंडी असलेला “देख रहे हो विनोद” हा संवाद चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. या संवादाला घेऊन अनेक मीम्स तयार होत असतात. मीम्स हा थट्टा किंवा करमणुकीचा विषय होता; पण आता मीम्सही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसने भूषण पात्र रंगवत असलेले अभिनेते दुर्गेश कुमार यांनाच घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचे व्हिडीओ तयार केले आहेत.

मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी काँग्रेसने वापरलेली ही शक्कल चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. “देख रहे हो प्रमोद…” असे म्हणत दुर्गेश कुमार छोट्या छोट्या व्हिडीओंमधून काँग्रेसच्या कामांची जाहिरात करतात; ज्यामुळे मतदारांवर सरकारच्या योजना अतिशय ठळक पद्धतीने ठसवता येते.

२०१४ साली “बहोत हुई महंगाई की मार, अब की बार…” अशी टॅगलाईन घेऊन भाजपाने जाहिराती तयार केल्या. अर्थातच या जाहिरातींचा योग्य परिणाम साध्य झाला. लोकांच्या तोंडी या टॅगलाइन बसल्या आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. २०१४ व २०१९ च्या पराभवानंतर काँग्रेसनेही डिजिटल प्रचारात आघाडी मिळविण्याचा प्रयत्न कसोशीने केला आहे.

नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने अनेक वर्षांनंतर भाजपावर मोठा विजय मिळविला. कर्नाटकच्या निवडणुकीतही काँग्रेसने जमिनीवरील प्रचार, रॅली, जाहीर सभा यांसह ऑनलाइन प्रचाराला महत्त्व दिले. ‘४० टक्के कमिशनवाले सरकार’ अशी टॅगलाइन घेऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा यूपीआय स्कॅनर कोड तयार करीत जनतेने कमिशन द्यावे, असा प्रचार केला. अर्थातच यामुळे सरकारविरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले.

कर्नाटकनंतर छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही हाच कित्ता गिरविण्याचा प्रकार काँग्रेसकडून होत आहे. तरीही ऑनलाइन प्रचारात छत्तीसगडने चांगलीच आघाडी घेतली आहे. व्हिडीओ आणि मीम्स यांच्यासह छत्तीसगडमधील काँग्रेसचे ट्विटर हँडल एका ओळीत उपरोधिक ट्वीट करण्यातही चांगलेच पटाईत आहे. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोपरखळी लगावणारे ट्वीट केले. “एक CM को हराने के लिए, एक PM ने अपना BP हाई किया हुआ है”, अशा आशयाचे ट्वीट करीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जंग जंग पछाडत असल्याचा टोमणा ट्विटरवरून लगावण्यात आला आहे.

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लक्ष्य करीत आहेत. त्यावरून एका ओळीत ही उपरोधिक प्रतिक्रिया देण्यात आली.

आणखी वाचा >> छत्तीसगडमध्ये कोण बाजी मारणार? आगामी मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे!

काँग्रेसने हटके प्रचार केल्यानंतर भाजपाही काही कमी नाही. भाजपानेही काँग्रेस सरकारची कमतरता दाखविण्यासाठी व्हिडीओ तयार केले आहेत. शेतकऱ्यांचे हाल, महिलांची सुरक्षा, दारूबंदी, कर्जमाफी यांच्यावर जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. पण, पंचायत वेब सीरिजमुळे भाजपाचीही ‘पंचाईत’ झाल्याचे दिसते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने भाजपाने जशीच्या तशी उचलून त्यांच्या जाहीरनाम्यात घातली, असा आरोप काँग्रेसकडून होत असताना काँग्रेसच्या जाहिरातीचा पॅटर्नही भाजपाने ‘फॉलो’ केल्याचे दिसते.

पोलखोल या टॅगलाइनने भाजपाने काही व्हिडीओ तयार केले आहेत. पंचायत वेब सीरिजचे टायटल संगीत या व्हिडीओंसाठी वापरण्यात आले आहे. काँग्रेसनेही याच संगीताचा वापर करून, त्यांचे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या जाहिरातीला तशाच पद्धतीने भाजपाने उत्तर दिल्याचे दिसते.

भरोसा विरुद्ध गॅरंटी

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने पाच गॅरंटी देऊन मतदारांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. आता भाजपाकडून छत्तीसगडमध्ये ‘मोदी गॅरंटी’ देण्यात आली आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात ‘२० मोदी गॅरंटी’ देण्यात आल्या आहेत. याउलट काँग्रेसने ‘भरोसा’ शब्द पकडून मतदारांचा काँग्रेस सरकारवर विश्वास असल्याचे दाखविले आहे. एकूणच या प्रचारयुद्धात कुणाची सरशी होते? भरोसा की गॅरंटी याचा निर्णय ३ डिसेंबर रोजी निकालाच्या दिवशी होईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh assembly election 2023 congress and bjp campaign war over panchayat web series kvg