Chhattisgarh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : विधानसभा निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल रविवारी (३ डिसेंबर) जाहीर करण्यात आले. यापैकी छत्तीसगडमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसचं सरकार येईल असे चित्र होतं. जनमत तसेच मतदानोत्तर चाचण्यांनीही हाच कल दाखवला होता. मात्र आज जाहीर झालेले निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. सत्ताविरोधी लाटेत काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपाने ५६ आणि काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या आहेत, तर एक जागा गोंडवाना गणतंत्र पार्टीने जिंकली आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेते व मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही निर्माण केली आहे, अशी चर्चा सुरू होती. त्याचबरोबर कथित महादेव बेटिंग अॅप प्रकरणानेही काँग्रेसचं नुकसान केलं. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावं पुढे आली होती. या प्रकरणावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या प्राचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसेच भाजपाच्या सर्व प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी महादेव बेटिंग अॅप प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. यामुळे निवडणुकीत काँग्रेसविरोधात मतदान झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता अनेक एग्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. इंडिया टुडेने अंदाज वर्तवला होता की, छत्तीसगडमध्ये भाजपाला ३६ ते ४६ आणि काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील. एबीपी न्यूज सी-व्होटरने अंदाज वर्तवला होता की, छत्तीसगडमध्ये भाजपाला ३६ ते ४८ आणि काँग्रेसला ४१ ते ५३ जागा मिळतील. तर इंडिया टीव्हीने म्हटलं होतं की, छत्तीसगडमध्ये भाजपाला ३० ते ४० आणि काँग्रेसला ४६ ते ५६ जागा मिळतील. हे तिन्ही एग्झिट पोल चुकीचे ठरले आहेत.
हे ही वाचा >> Rajasthan Election : अंतिम निकाल जाहीर, भाजपाला स्पष्ट बहुमत, कोणते एग्झिट पोल खरे ठरले?
जन की बातने जारी केलेल्या एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला ३४ ते ४५ आणि काँग्रेसला ४२ ते ५३ जागा मिळतील. तर दैनिक भास्करच्या एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला ३५ ते ४५ आणि काँग्रेसला ४६ ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, हे दोन एग्झिट पोलदेखील चुकीचे ठरले आहेत.