छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. दरम्यान, नललवाद्यांनी मतदान केंद्रांवर हल्ले केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी आणि सीमा सुरक्षा बल तसेच डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एके ४७ रायफल जप्त केल्या आहेत. या चकमकीनंतर बांद्यासह आसपासच्या भागात सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाले असावेत असा अंदाज वर्तवला आहे. कांकेरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, नक्षलवाद्यांकडे एके ४७ सारख्या रायफल असून ते अत्याधुनिक शस्त्रास्रांसह हल्ले करत आहेत. ही चकमक मतदान केंद्रापासून हाकेच्या अंतरवर घडली आहे. दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा बल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीमुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता.
दुसऱ्या बाजूला सुकमा आणि नारायणपूर जिल्ह्यातही नक्षलवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सुकमा येथे झालेल्या चकमखीत काही जवान जखमी झाले आहेत. सुकमाच्या ताडमेटला आणि दुलेट गावाच्या दरम्यान सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. तर कोब्रा २०६ पथकाच्या जवानांबरोबरची चकमक बराच वेळ चालू होती.
हे ही वाचा >> Chhattisgarh Election : नक्षलग्रस्त बस्तरमध्ये आज मतदान; न्यूटन चित्रपटाची कथा इथे कशी लागू पडते?
मीनपा भागात मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) संरक्षण देण्यासाठी जंगलांमध्ये संरक्षण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सुकमात झालेली चकमक २० मिनिटं चालली. या चकमकीदरम्यान, दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीतही काही जवान जखमी झाले आहेत. तसेच जवानांनी काही नक्षलवाद्यांना मृतदेह खांद्यावर घेऊन पळून जाताना पाहिलं. चकमक झाली त्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहायला मिळाले आहेत. यावरून काही नक्षली जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच या चकमकीत दोन नक्षली ठार झाले आहेत असं संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं.