छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र होतं. पण आता मतांचा कल काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. यावर आता छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रमण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय भाजपाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार का? यावरही रमण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
‘छत्तीसगडमध्ये भाजपाचीच सत्ता येईल’ असा दावा करत रमण सिंह म्हणाले की, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप मोठा होता. मद्य घोटाळा, कोळसा घोटाळा आणि महादेव अॅप घोटाळा अशा प्रकरणामुळे लोक भूपेश बघेल यांना बदलू इच्छित होते. राज्यातील प्रत्येक महिलेनं आणि युवकांनी आम्हाला मतदान केलं. शेतकऱ्यांनीही आम्हाला मतदान केलं.
भाजपाची सत्ता आल्यास तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असा प्रश्न विचारला असता रमण सिंह यांनी पुढे नमूद केलं, “हा पक्षाचा निर्णय आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने मला जेव्हा जी जबाबदारी दिली, त्याचं मी पालन केलं. यापुढेही जसे पक्षाचे निर्देश असतील, त्याप्रमाणे ज्याला जी जबाबदारी दिली जाईल, त्याच्याबरोबर आम्ही सगळे मिळून छत्तीसगडमध्ये चांगलं सरकार स्थापन करू.”
“मी पार्टीकडे कधीही काहीही मागितलं नाही. पार्टीने जेव्हा जी जी जबाबदारी दिली, ती मी पार पाडली. पुढे माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यायची, ते पक्षाचे वरिष्ठ लोक ठरवतील. दोन फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल मागे पडले. याचा अर्थ जनमत त्यांच्या विरोधात आहे,” असंही रमण सिंह म्हणाले.