केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने व्यवस्था कशी आहे, काय काय सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत हे सांगितलं आहे. तसंच हिंसाचार टाळण्यावर आमचा भर आहे. पैसे वाटप झाल्यास फोटो काढून पाठवण्याचं आवाहनही केलं आहे. त्याच बरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की प्रचारादरम्यान जे उमेदवार साडी, मद्य किंवा इतर भेटवस्तूंचं वाटप करतील त्यावर कारवाई केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी?

आमच्यासमोर निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर रोखण्याचं आव्हान आहे. मात्र आम्ही या आव्हानाला समर्थपणे तोंड देत आहोत. मनी आणि मसल पावरचा वापर कुणी केल्यास आम्ही कठोर कारवाई करु. प्रचाराच्या दरम्यान साड्या, मद्य, भेटवस्तू यांचं वाटप केल्यास कारवाई केली जाणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अशा कुठल्याही व्यवहाराला थारा दिला जाणार नाही. ही माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे खोट्या बातम्यांमागची सत्यताही आम्ही तपासणार आहोत. त्यासाठी वेबसाईट तयार केली जाईल असंही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीतील काळ्या पैशांवर ‘वॉच’, ११ निवडणुकीत ३४०० कोटींची रक्कम जप्त

दोनवेळा मतदान करणाऱ्यांवर कारवाई

निवडणुकीत दोनवेळा मतदान करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी द्वेष निर्माण होतील अशी भाषणं देऊ नयेत किंवा चिथावणी देणारी वक्तव्यंही करु नयेत. निवडणूक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन राजीव कुमार यांनी केलं आहे.

देशात ८२ लाखाहून अधिक वयोवृद्ध मतदार आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेणार आहोत. देशात पहिल्यांदाच असं होणार आहे. ८५ वर्षाहून अधिक वयाचे मतदार आणि ४० टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात येईल आणि त्यांना घरीच मतदान करायला सांगितलं जाणार आहे, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief election commissioner rajiv kumar voters to not forward fake news and unverified information also said this thing about gifts saree scj