लोकसभा निवडणुकांचे निकाल देशभरातील राजकीय विश्लेषक व राजकीय पक्षांसाठी सर्व दावे खोडून काढणारे ठरले आहेत. देशात यंदा एनडीएला ४०० पार जागा मिळतील असे दावे मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी केले होते. पण एनडीएला अवघ्या २९३ जागा मिळाल्या. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर यश मिळालं. इतर १८ खासदार निवडून आले. या स्थितीत एकीकडे एनडीएकडे सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत असलं, तरी इंजिया आघाडीकडून एनडीएच्या घटक पक्षांशी संपर्क केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच चिराग पासवान त्यांच्या सर्व खासदारांसंह नितीश कुमारांच्या भेटीला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडतंय पडद्यामागे?

एनडीएला २९३ जागांवर विजय मिळाल्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आलं खरं, मात्र, त्यावर त्यांच्याकडे अवघ्या २१ जागा आहेत. त्याचवेळी इंडिया आघाडीनंही २३२ जागांपर्यंत मजल मारल्यामुळे त्यांना बहुमत हवं असल्यास त्यांना ४० अतिरिक्त जागांची तजवीज करावी लागेल. या ४० जागांसाठी एनडीएमधल्या घटक पक्षांशी संपर्क केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी इंडिया आघाडीचे शीर्षस्थ नेतेमंडळी बोलणी करत असल्याचेही दावे केले जात आहेत. त्यातच चिराग पासवान-नितीश कुमार भेटीमुळे या दाव्यांना बळ मिळालं आहे.

https://x.com/ANI/status/1798216965959700983

भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेट नाकारली!

मंगळवारी निकालाच्या दिवशी बिहारचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी नितीश कुमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. पण त्यावेळी नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांना भेट नाकारली होती. आपल्याच उपमुख्यमंत्र्यांना भेट नाकारल्यामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का? अशी चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठ एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी मोठा विजय मिळालेला नाही. त्यामुळे नितीश कुमार इंडिया आघाडीच्या गोटात दाखल झाले, तर सत्तास्थापनेची समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नितीश कुमार-चिराग पासवान भेट

दरम्यान, आपल्याच उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यास नकार देणारे नितीश कुमार चिराग पासवान यांना मात्र भेटले. चिराग पासवान यांनी लोकजनशक्ती पार्टीच्या ५ खासदारांसंह आज सकाळी नितीश कुमार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली.

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? बिहारमध्ये घडामोडींना वेग; भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला दिला नकार!

“आज आमची चर्चा झालेली नाही. फक्त शुभेच्छा द्यायला आलो होतो. ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आमच्या आघाडीला मजबुती द्यायचं काम केलं आणि एनडीएनं बिहारमध्ये जी कामगिरी केली त्याचं श्रेय एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं त्याचप्रकारे ते माझे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही जातं”, अशी प्रतिक्रिया चिराग पासवान यांनी भेटीनंतर दिली. “आज मी, माझ्या पक्षाचे सर्व खासदार, त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला शुभेच्छा दिल्या”, असंही त्यांनी नमूद केलं.

नितीश कुमार होणार पंतप्रधान? बिहारचे मुख्यमंत्री पलटणार का लोकसभा निकालाची बाजी? नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत उडवली खिल्ली

पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मचा आनंद

दरम्यान, चिराग पासवान यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. “आता सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी आम्ही सगळे दिल्लीला जाणार आहोत. माझे पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chirag paswan meets nitish kumar yadav latest news nda pm narendra modi pmw