Karnataka Election 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वपक्षीय उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही या प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. कर्नाटकातील निकालावरून देशभरातील इतर विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, कर्नाटक प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही गेले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण काल बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपावर तोफ डागली. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही कडक शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“भाजपावाले कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते पक्के मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. त्यांना मराठी माणसाचा आवाज बुलंद झालेला दिसला की ताबोडतोब कारस्थानं करतात. मग तो महाराष्ट्र असो किंवा सीमाभाग असो” अशी टीका संजय राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारात ते सहभागी झाले होते.
हेही वाचा >> “भाजपावाले चोर आणि लफंगे आहेत, ते कधी…”, बेळगावातून संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल!
चित्रा वाघांचे प्रत्युत्तर काय?
भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांचं नाव घेत टीका केली. “गैरव्यवहारात जेलची हवा खाऊन आलेल्या आरोपीला प्रचारात उतरवण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय”, असं त्या म्हणाल्या.
पुढे त्या संजय राऊत यांना उद्देशून म्हणाल्या की, “अहो सर्वज्ञानी, लाज तर तुम्हाला वाटायला पाहीजे.. तुम्ही तर उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. शिवसेना फोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम राऊतांनी केलंय… आता ते सुपारी घेऊन आलेत. बेळगावांत भडकावू भाषण देऊन दंगे घडवण्याचं काम सर्वज्ञानी करताहेत.”
दरम्यान, चित्रा वाघ या नागेश मनोळकर यांच्या प्रचारासाठी कर्नाटकात दाखल झाल्या आहेत. त्यांनी नारीशक्तीचा विकास हाच भाजपाचा ध्यास या मुद्द्यावरून कर्नाटकात प्रचार सुरू केला आहे.
“माझ्या माऊलींना डोक्यावर हंडा घेऊन वणवण करावी लागू नये, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरात पाणी देण्याची योजना भाजपा सरकारच्या माध्यमातून राबवली जातेय. अशाच सर्व अडचणींवर सडेतोड तोडगा काढण्यासाठी नागेशजी यांना विजयी करण्याचा निर्धार उपस्थित प्रत्येकाने केला”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.