केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांना यावेळी भाजपाने लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. पियूष गोयल यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला त्यांच्या विरोधात उभं करण्यासाठी उमेदवारही सापडत नाही अशी स्थिती आहे. त्यांच्या पहिल्याच प्रचार रॅलीत ‘मुंबईचा आवाज दिल्लीत घुमणार’ असा सूर ऐकू येतो आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून पियूष गोयल यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्या पहिल्याच प्रचार रॅलीत याची झलक पाहण्यास मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पियूष गोयल यांनी रामनवमीच्या दिवशी फोडला प्रचाराचा नारळ

“मुंबईत राहणारे पियूष गोयल हे जर केंद्र सरकारमध्ये असतील तर उत्तर मुंबई मतदारसंघासाठी नक्कीच फायदा होईल,” असं मत मालाड पश्चिमचे स्थानिक रहिवासी दीपक जोशी यांनी व्यक्त केलं. बुधवारी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पियूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बोरीवली पूर्व भागात पियूष गोयल यांनी मेळावा घेतला, तसंच रॅलीही काढली. एकाच दिवशी त्यांचे पाच मेळावे होते. यावेळी पियूष गोयल यांनी गिरणी कामगार, त्यांच्या वसाहती तसंच विविध सोसायट्यांमधील लोकांच्या भेटी घेतल्या आणि आपल्या प्रचारमोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या.

उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला

१९९१ पासूनच्या नऊ निवडणुकांमध्ये सातवेळा भाजपाने उत्तर मुंबईची जागा राखली आहे. त्यामुळे उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ मध्ये १६ लाखांहून अधिक गुजराती-मारवाडी लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघाने गोपाळ शेट्टींना ४ लाख ६० हजार मतांच्या मताधिक्याने विजयी केलं होती. यावेळी सत्तरीच्या घरात असलेले गोपाळ शेट्टीही पियूष गोयल यांच्या प्रचारात उतरले आहेत.

पियुष गोयल यांच्या प्रचारसभा, देवेंद्र फडणवीस या प्रचारसभेत सहभागी (फोटो-संकल्पदीप बॅनरर्जी, इंडियन एक्स्प्रेस)

गोपाळ शेट्टी, देवेंद्र फडणवीस हे देखील उतरले प्रचारात

पियूष गोयल यांनी बुधवारी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हा त्यांनी भद्रन नगरमधल्या ७५ वर्षे जुन्या असलेल्या राम मंदिरात आरती केली. तसंच उत्तर मुंबईची उत्तम मुंबई करुन दाखवणार असं आश्वासनही स्थानिकांना दिलं. पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच ते मतदारपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असून रहाणीमानाचा दर्जा उंचावणं हा गोयल यांनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. त्यामुळेच उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचं आश्वासन पियूष गोयल मतदारांना देत आहेत. तसंच रोजच्या वाहतूक कोंडीपासूनही सुटका होईल असंही आश्वासन पियूष गोयल यांनी मतदारांना दिलं आहे. पियूष गोयल यांनी या मतदारसंघातील निवडणुकीची सांगड देशाच्या लक्ष्याशी घालताना पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकार हे भारताला येत्या काळात विश्वगुरू करेल.”

पियुष गोयल राम मंदिरात अभिेषक करताना (फोटो संकल्पदीप बॅनर्जी, इंडियन एक्स्प्रेस)

भारत देश विश्वगुरु असेल हे स्वप्न मोदींनी पाहिलं आहे-पियूष गोयल

पियूष गोयल म्हणाले, “आपला भारत हा विकसित भारत करण्याचं मोदी यांचं उद्दीष्ट आहे. तोच मोदी यांचा ध्यास आहे. सध्याचं युग हे भारत युग आहे. मात्र एक दिवस असाही येईल की भारत सगळ्या जगाला मार्ग दाखवेल. भारत देश ‘विश्वगुरु’ असेल. आपल्या देशाला या सकारात्मकतेने वाटचाल करायची आहे.”

ही रॅली झाल्यानंतर पियूष गोयल हे भद्रन नगरहून गणेश नगर भागात गेले. या ठिकाणी उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक समाजातले आणि अल्प उत्पन्न गटातले लोक राहातात. या ठिकाणीही पियूष गोयल यांचं स्वागत करण्यात आलं.

स्थानिक रहिवासी पियूष गोयल यांच्याविषयी काय म्हणाले?

उत्तर मुंबईतून जेव्हा पियूष गोयल यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा रोज लोकलने प्रवास करणाऱ्या मतदारांना विशेष आनंद झाला. “पियूष गोयल रेल्वे मंत्री असताना त्यांनी मालाड, कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांना भेट देऊन या स्थानकांचा कायापालट केला. पियूष गोयल मुंबईकर आहेत त्यामुळे त्यांना मुंबईची खडा न् खडा माहिती आहे. पियूष गोयल मंत्री झाल्यानंतर मुंबईतली धोरणं आखणं त्यांना जास्त सोपं जाईल” असं स्थानिक रहिवासी आणि व्यापारी भरत गुप्ता यांनी सांगितलं.

दुसरे स्थानिक रहिवासी रुपेश सिंग म्हणाले, “पियूष गोयल यांच्यामुळे उत्तर मुंबईत बऱ्याच गोष्टी सुधारल्या आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना आणखी सुविधा मिळायला हव्या. त्यासाठी ते (पियूष गोयल) मंत्री झाल्यावर प्रयत्न करतील. ऑफिस अवर्समध्ये लोकल ट्रेनने प्रवास करणं हे आमच्यापुढचं आव्हान असतं. गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवणं आणि त्यांच्या फेऱ्या वाढवणं हा त्यावरचा उपाय आहे. आम्हाला रोज सामोरं जावं लागणाऱ्या या समस्येवर पिय़ूष गोयल उपाय काढतील अशी आशा आहे.”

बोरिवलीतत्या प्राचीन राम मंदिरालाही दिली भेट

प्रचाराच्या पहिल्या दिवशी विविध रहिवाशांशी संवाद साधल्यानंतर पियूष गोयल यांनी बोरीवली पश्चिम भागात असलेल्या बाभई नाका येथील राम मंदिराला भेट दिली. मात्र त्याआधी रामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीत पियूष गोयल सुमारे एक किलोमीटर चालले. “निवडणुकीचे उमेदवार या मंदिराला भेट देतातच” अशी माहिती मंदिराचे विश्वस्त शैलेश चोगले यांनी दिली. “हे राम मंदिर १८७८ साली बांधण्यात आलं असून दरवर्षी रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. क्षत्रिय पाठारेंची मोठ्या संख्येने वस्ती असलेल्या या परीसरामध्ये अन्य मराठी समाज व गुजरातीही मोठ्या प्रमाणावर राहतात,” अशी माहिती चोगले यांनी दिली.

या मंदिरात जेव्हा पियूष गोयल आले तेव्हा तिथल्या वयोवृद्ध भाविकांना आश्चर्याचा धक्का बसला. पियूष गोयल यांनी काही वृद्ध भाविकांना पाया पडून नमस्कार केला आणि त्यांच्याशी संवादही साधला. भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी पियूष गोयल यांच्यासह होते. त्यांनीच पियूष गोयल आणि या वयोवृद्ध भाविकांची ओळख करुन दिली.

यावेळी उपस्थित असलेले भाविक राम शंकर पटेल म्हणाले, “पियूष गोयल हे जर निवडून आले तर मुंबईतल्या उपनगरांची स्थिती आणखी सुधारेल. तसंच इथला विकास होईल. १९९९ मध्ये राम नाईक याच मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले होते. त्यांनीही उत्तर मुंबईसाठी बरंच काम केलं होतं.” दिग्गज नेत्याला आपण निवडलं तर त्याचा मुंबईच्या विकासासाठी फायदा होतो हे मुंबईकरांना ठाऊक आहे, असंही पटेल म्हणाले.

मुंबईतलं मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. १६ एप्रिलच्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. आम्ही रोज पाच ते सहा सभा आणि मेळाव्यांमध्ये सहभागी होत आहेत असं इथल्या स्थानिक नेत्याने सांगितलं.

पियूष गोयल यांच्या प्रचारात गोपाळ शेट्टी यांचा सहभाग हा महत्त्वाचा मानला जातो आहे. त्यांच्याबाबत स्थानिक रहिवासी संतोष सेठ म्हणाले, “मागच्या दहा वर्षांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनींवरची अतिक्रमणं हटवली. त्याठिकाणी उद्याने, मैदाने आदींचं निर्माण केलं. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी अशा जागांची निर्मिती उपयुक्त ठरली आहे.”

यानंतर या मंदिरात पियूष गोयल यांनी आरती केली. तसंच भक्तांबरोबरच पालखी पियूष गोयल यांनी पालखीही खांद्यावर घेतली. त्यानंतर ते पुढच्या प्रचारसभेसाठी व रामनवमीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी दहीसरला रवाना झाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chorus on piyush goyal debut campaign mumbai upgrade voice in delhi scj