निवडणुकीमुळे उत्तर प्रदेश आण पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. एकेक एक मुद्द्याचा किस पाडत निवडणुक प्रचारानिमित्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. असं असतांना आणखी एका मुद्द्यावरुन राजकारण आणि टीकेचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील तब्बल २५ भाजपाच्या नेत्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर सुरक्षा व्यवस्थेचे प्रदर्शन करत लोकांमध्ये भिती निर्माण केली जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव हे मैनपुरी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह बघेल यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार भदोही, खासदार रमेश चंद बिंड, पंजाबात निवडणुक प्रचारासाठी जाणारे दिल्लीतील भाजपाचे खासदार हंसराज यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. तर अनेकांची सुरक्षा व्यवस्था वाय दर्जावरुन झेड दर्जाची करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चेन्नी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि आता अपक्ष निवडणुक लढवणारे निमिषा मेहता यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

याचबरोबर अवतार सिंग झीरा, सरदार दिदार सिंह भट्टी, सरदार कन्वर वीर सिंग तोहरा, सरदार गुरप्रित सिंह भट्टी, सरदार रहीकोट कमल, सुखविंदर सिंह बिंद्रा आणि परमिंदर सिंह धींडसा ही काही भाजप नेत्यांची नावे आहेत ज्यांची सुरक्षा व्यवस्था वाय वरुन जेड दर्जाची करण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. निवडणुक प्रचार काळात संबंधित नेत्यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाकडून आला असल्याने झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिली आहे.

या निर्णयाबाबत केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान झेड दर्जाच्या सुरक्षेच्या मुद्दावरुन काँग्रेसने टीका केली आहे. अशा सुरक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये भिती निर्माण केली जात आहे. अशी सुरक्षा व्यवस्था म्हणजे एक प्रकारे लोकांसमोर शक्ती प्रदर्शनच आहे अशी टीका काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही मोठ्या संख्येने भाजपच्या नेत्यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cisf z security for 25 bjp leaders in up punjab asj